For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉलिंगमध्येही आता टाईम आऊट

06:37 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
बॉलिंगमध्येही आता टाईम आऊट
Advertisement

 60 सेकंदात सुरु करावे लागणार पुढचे षटक  :  नियमभंग केल्यास पाच धावांचा दंड : आयसीसीचा महत्वपूर्ण निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई, नवी दिल्ली

आयसीसीने नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. खेळाचा वेग वाढावा, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. आयसीसीने आता गोलंदाजांसाठीही टाईम आऊट नियम लागू केला आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गोलंदाजाने जर एका डावात पुढील नवीन षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर 5 धावांचा पेनल्टी लावण्यात येईल. म्हणजेच, फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा दिल्या जातील. हा नियम पुरुष क्रिकेटमध्ये वनडे आणि टी 20 फॉरमॅटमध्ये लागू असेल. आयसीसीने मंगळवारी (21 नोव्हेंबर) या निर्णयाची घोषणा केली.

Advertisement

आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. सध्या तरी हा नियम ट्रायलसाठी लागू करण्यात येणार असून त्यानंतर त्याची उपयुक्तता आणि परिणाम लक्षात घेऊन तो कायमस्वरूपी लागू केला जाईल. डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत पुरुषांच्या वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये ट्रायल आधारावर स्टॉप क्लॉक लागू करण्यात येणार आहे. षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी या स्टॉप क्लॉकचा वापर केला जाईल.  वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत हा नियम अमलात आणला जाणार आहे. 3 डिसेंबर रोजी ही मालिका सुरू होणार आहे.

स्टॉप क्लॉक नियम आहे तरी काय

क्रिकेट सामन्यात दोन षटकांच्या दरम्यान खर्च होणारा मोकळा वेळ नियंत्रणात आणण्यासाठी आयसीसीने हा नियम लागू केला आहे. नियमानुसार एक षटक संपल्यानंतर पुढच्या षटकाची सुरुवात 60 सेकंदांच्या आतमध्ये झाली पाहिजे. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून एका डावात तीन वेळा ही चूक झाली, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मिळतील. असा हा आयसीसीचा नवा स्टॉप क्लॉक नियम आहे. या नियमानुसार गोलंदाजांकडून चूक झाली, तर संपूर्ण संघाला याची किंमत मोजावी लागणार आहे.

सध्या वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला 50 षटकांसाठी साडे तीन तासांचा वेळ दिला जातो. तसेच टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी 1 तास 25 मिनिटांचा वेळ असतो. त्यापेक्षा जास्त वेळ खर्च झाला, तर तीन यार्ड सर्कलचा नियम लागू होतो. या नियमानुसार ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ झाला, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये उभा केला जातो. तसेच आयसीसीच्या नियम 2.22 नुसार खेळाडूंकडून आर्थिक दंड देखील वसूल केला जातो.

Advertisement
Tags :

.