आता भारत - न्यूझीलंड फायनलचे वेध
किवींविरुद्धची कामगिरी पाहता श्रेयस अय्यरवर राहील खास लक्ष
वृत्तसंस्था/दुबई
सध्या क्रिकेट रसिकांना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्या रविवारी होणाऱ्या भारत व न्यूझीलंडमधील सामन्याचे वेध लागले असून न्यूझीलंड केनियामध्ये आयसीसी नॉकआउट्स ट्रॉफी मिळविल्यानंतर आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील विजेतेपदाची 25 वर्षांपासून चाललेली प्रतीक्षा संपविण्यास उत्सुक आहे. 2000 मध्ये त्यांनी भारताला चार गडी राखून पराभूत करून वरील जेतेपद उचलले होते. दुसरीकडे, 2013 नंतरच्या दुसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी प्रयत्नरत आहे.
आतापर्यंतच्या स्पर्धेत भारताला अपराजित राहिलेला आहे आणि किवींनी देखील मिशेल सॅन्टनरच्या नेतृत्वाखाली फलंदाजी व गोलंदाजीत चांगली कामगिरी बजावलेली आहे. ‘मेन इन ब्ल्यू’ना 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि 2021 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा यातून काढता येईल. या सामन्यात सर्वांचे लक्ष मधल्या फळीला बळकटी देणाऱ्या श्रेयस अय्यरवर राहील. त्याने सावधगिरी आणि आक्रमकतेच्या चांगल्या मिश्रणाने सर्वांना प्रभावित केले आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविऊद्ध अय्यरची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्याने किवीविऊद्धच्या नऊ एकदिवसीय सामन्यांतील आठ डावांमध्ये 70.37 सरासरीने आणि 100.71 च्या स्ट्राइक रेटने दोन शतके आणि चार अर्धशतकांसह 563 धावा केल्या आहेत. यामध्ये 70 चेंडूंत 105 धावांची खेळीही समाविष्ट आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकात वानखेडे स्टेडियमवर ही खेळी करताना त्याने चार चौकार व आठ षटकार खेचले होते. त्याने त्यावेळी 67 चेंडूंत नोंदविलेले शतक हे विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यांचा विचार करता सर्वांत वेगवान शतक आहे.
न्यूझीलंडला वरुण चक्रवर्तीची धास्ती
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी कबूल केले आहे की, वऊण चक्रवर्ती हा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये एक‘मोठा धोका’ असेल आणि किवी संघ भारताच्या या गूढ फिरकीपटूला कसे सामोरे जावे यावर विचार करतील. मागील सामन्यात आमच्याविऊद्ध 42 धावांत 5 बळी मिळविल्यानंतर तो उद्या नक्कीच खेळणार अशी अपेक्षा आम्ही करतो. तो एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्याने मागच्या वेळी आमच्याविऊद्ध त्याचे कौशल्य दाखविले आहे. तो एक मोठा धोका आहे, असे स्टेड यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
विल्यमसन-भारतीय फिरकीपटू झुंज रंगणार
भारतीय फिरकी गोलंदाज आणि केन विल्यमसन यांच्यात दुबईतील खेळपट्टीवर चांगलीच झुंज रंगण्याची शक्यता असून विल्यमसन त्यांना तोंड कसे देतो ते सामन्याचा निकाल ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भारत फायनलमध्ये चार फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. भारताच्या पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यात जी खेळपट्टी वापरण्यात आली होती तीच उद्या वापरली जाणार असून त्या सामन्यात फिरकीपटूंना काही प्रमाणात मदत मिळाली होती. त्यामुळे न्यूझीलंडसाठी विल्यमसनचे कौशल्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी भारताविऊद्ध झालेल्या सामन्यात त्याने 81 धावा केल्या होत्या आणि त्यातून त्याचा दर्जा दिसला होता.
मॅट हेन्रीला दुखापत
न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला दुखापत झाल्याने तो चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी होणाऱ्या भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. न्यूझीलंड संघातील 33 वर्षीय मॅट हेन्री हा हुकमी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. चॅम्पियन्स स्पर्धेत त्याने आतापर्यंत 10 गडी बाद केले आहेत. भारताबरोबर यापूर्वी झालेल्या प्राथमिक फेरीतील सामन्यात त्याने 42 धावांत 5 गडी बाद केले होते. मॅट हेन्रीच्या खांद्याला ही दुखापत झाली असून त्याला गोलंदाजी करताना वेदना होत असल्याचे संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले. अंतिम सामन्याला अद्याप दोन दिवस बाकी असून तोपर्यंत हेन्रीची ही दुखापत पूर्ण बरी होईल, अशी आशा स्टेडने व्यक्त केली आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत एकमेव सामना प्राथमिक गटात गमविला आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता.