मारुतीनंतर आता टाटाचीही व्यावसायिक वाहने महागणार
उत्पादन खर्चात वाढीमुळे 2 टक्केपर्यंत किंमती वाढविण्याची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
मारुती सुझुकीनंतर आता टाटा मोटर्सने सोमवारी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन किमती 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे. टाटा मोटर्सने म्हटले आहे की अंतर्गत खर्च आणि लॉजिस्टिक्समध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की किंमत वाढ व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये लागू होईल आणि ही वाढ मॉडेल आणि प्रकारानुसार बदलेल.
मारुतीच्या कार 4 टक्केपर्यंत वाढणार
यापूर्वी, मारुती सुझुकीने एप्रिल 2025 पासून त्यांच्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा देखील केली होती. कंपनीने एप्रिल 2025 पासून त्यांच्या कारच्या किमतीत 4 टक्केपर्यंत वाढ जाहीर केली आहे. ही वाढ कंपनीच्या सर्व मॉडेल्समध्ये बदलणार आहे. सोमवारी टाटा मोटर्सच्या समभागांमध्ये 0.70 टक्के वाढ झाली. कंपनीचा समभाग एका महिन्यात 3.27 टक्के आणि 6 महिन्यांत 31 टक्क्यांनी घसरला.