आता इंग्रजीतही सत्यनारायण कथा
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
संस्कृतनंतर आता सत्यनारायण कथा आता इंग्रजीतही ऐकविली जाऊ लागली आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात पूजेदरम्यान सत्यनारायण कथा पुजारी इंग्रजीत ऐकवत असल्याचे दिसून येते. तर ज्या घरात ही पूजा होती, तेथील पुरुष, महिला आणि लहान मुले ही इंग्रजीतील ही कथा ऐकताना दिसून येतात.
व्हिडिओत पूजासाहित्य आणि पद्धत पाहिल्यास हे घर दक्षिण भारतीय संस्कृतीशी निगडित असल्याचे जाणवते. दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये इंग्रजीचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील कुठल्या तरी एका ठिकाणी ही पूजा पार पडली असावी असे मानले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारोवेळा पाहण्यात आला असून यावर कित्येक कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.
‘चला हिंदू धर्माचे ज्ञान आता इंग्रजीतही मिळू लागले आहे’ असे एका युजरने नमूद पेले आहे. तर एका युजरने ‘भारत प्रगती करतोय’ अशी कॉमेंट केली आहे. तर काही लोकांनी हा प्रकार क्रांतिकारी असल्याचे म्हटले आहे. ‘भटजी आता अपग्रेड झाले आहेत’ असेही काही जण म्हणत आहेत.
श्रावणमासात सत्यनारायण पूजेचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावणात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा करविली जाते. या पूजेदरम्यान सत्यनारायण व्रतकथा सांगण्यात येते.