आता पाकिस्तानला धडा शिकवावाच लागणार
निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांची प्रतिक्रिया
बेळगाव : भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम व सज्ज आहेत. यापूर्वीही भारताने त्यांना चोख उत्तर दिले आहे. स्थानिकांच्या मदतीशिवाय असा भ्याड हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला आता धडा शिकवावाच लागणार आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय शेकटकर पुढे म्हणाले, सध्या पाकिस्तानची अंतर्गत स्थिती खराब आहे. तेथील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानी लष्कराने घडवून आणला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान, सिंध, खैबरपक्तूनख्वा आदी परिसरात अस्थीर वातावरण आहे.
तेथे पाकिस्तानचे शासन चालत नाही.
त्यामुळे त्यांचे लक्ष वळवून भारतविरोधी वातावरण निर्मितीसाठी पाकिस्तानने हा हल्ला घडवून आणला आहे. भारताने या हल्ल्याला उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे लक्ष भारतावर केंद्रित करून त्यांना संपूर्ण देश एकत्र करायचा आहे. त्यामुळे भारतानेदेखील या हल्ल्याला चोख उत्तर देणे अपेक्षीत आहे. सरकारला या भ्याड हल्ल्याविरुद्ध कारवाई करावीच लागणार आहे. ती केली नाही तर भारतीय नागरिकही सरकारला याचा जाब विचारतील. पण भारत शांत बसेल असे मला वाटत नाही. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदल पाकिस्तानला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आणि सज्ज आहेत. पहलगाम येथील हल्ला नियोजनपूर्वक करण्यात आला आहे. आपण मेजर जनरल असताना या भागात काम केले आहे. त्यावेळी या परिसरातील दहशतवाद शिगेला पोहोचला होता. पहलगाम हा दुर्गम भाग आहे. तेथे गाड्या जात नाहीत, घोड्यावरून किंवा पायी चालत याठिकाणी पोहोचावे लागते. या निसर्ग संपन्न परिसरात हल्ला होईल असे वाटले नव्हते. मात्र तो झाला.