...आता पोलीस बंदोबस्ताला सुट्टी नाही!
सांगली / विनायक जाधव :
आता श्रावण महिना सुरू झाला. त्यामुळे सणासुदीला प्रारंभ झाला आहे. त्याचा ताण आपोआपच पोलिसांवर येतो. सण आला की गर्दी आली आणि गर्दी आली की पोलीस आलेच. त्यामुळे आता पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढणार आहे. साधा सण असला तरीसुध्दा आता हटकून गर्दी आणि वादावादी होतेच. ही वादावादी टाळण्यासाठी पोलिसांना त्याठिकाणी अनायसे बंदोबस्त द्यावाच लागतो. श्रावण महिन्याचे सण झाले की तात्काळ गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी पाठोपाठ येतेच. यातून पोलिसांना विसावा मिळण्याआधीच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुका झाल्यानंतरच आता पोलिसांचा बंदोबस्तातून सुटका होणार आहे. त्यामुळे पोलिसांना आता सुट्टीच नाही...!
- सांगली पोलिसांना बंदोबस्तातून सुटका नाहीच...
सांगली पोलिसांना आजपर्यंत कधीच बंदोबस्तातून सुटका होत नाही. कारण आषाढी एकादशी आली की, आषाढी वारीचा बंदोबस्त, एक जानेवारी आला की भीमा-कोरेगाव बंदोबस्त तसेच नागपंचमी आली की बत्तीस शिराळा बंदोबस्त, गणेशोत्सवात तर पंधरा दिवस बंदोबस्तात पोलीस असतात. नवरात्रीमध्ये नऊ दिवस आणि दिवाळीत तर आठ ते पंधरा दिवस बंदोबस्तात जातात. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्तातून सुटका मिळतच नाही. याचे कारण म्हणजे सांगली पोलीस दलात बंदोबस्तसाठी लागणारे पोलीस आता कमी झाले आहेत. त्यामुळे बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांवरच मोठ्या प्रमाणात ताण येतो. हा ताण कमी कसा करणार, याबाबत कोणतेही उत्तर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नाही. यावर अनेकवेळा पोलिसांनी या बंदोबस्ताला नकार दिला आहे. तरीसुध्दा त्यांची यातून सुटका झाली नाही. कारण बंदोबस्ताला असणारे पोलिसांचे बळ अपुरे असल्याने यातून सुटका होवू शकत नाही. यामुळे सांगली पोलीस दलातील अनेक पोलीस हे फक्त आणि फक्त बंदोबस्तात असतात. आणि ते फक्त हजेरीलाच त्यांच्या पोलीस ठाण्यात येतात, इतकी त्यांची वाईट अवस्था झाली आहे.
- अपुरे पोलीस दल
सांगली पोलीस दलाची ज्यावेळी रचना करण्यात आली. त्यावेळी जवळपास दीड ते दोन हजार व्यक्तीमागे एक पोलीरा, अशी करण्यात आली होती. त्यामुळे आता लोकसंख्या वाढली तरीसुध्दा पोलिसांची संख्या त्या पटीने वाढताना दिसत नाही. वाढलेल्या गुन्हयाची संख्या आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे पोलीस दल अपुरे पडत चालले आहे. यावर विचार करण्याची गरज आहे. एक हजारापेक्षा कमी लोकसंख्येला एक पोलीस अशी रचना करण्याची गरज आहे. त्याचवेळी हे शक्य होईल अन्यथा वाढत्या लोकसंख्येनुसार जर पोलीरा वाढले नाहीत तर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण येवू शकतो. आणि त्या पोलिसांना सातत्याने बंदोबस्त करून त्यांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होवू शकतात. याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
- ३० टक्के पोलीस बंदोबस्त करू शकत नाहीत
सध्या सांगली पोलीस दलात जे पोलीस आहेत. त्यातील ३० टक्के पोलीस हे बंदोबस्त करू शकत नाहीत. कारण त्यांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याशिवाय त्यांना इतका मोठा पोलीस बंदोबस्ताचा ताण सहन होवू शकत नाही. याशिवाय अनेक पोलीस हे आजारी रजेवर आहेत. त्यामुळे जवळपास ३० टक्के पोलीस हे बंदोबस्त करू शकत नाहीत. उर्वरित ७० टक्के पोलिसांच्यावरच बंदोबस्ताचा ताण येत आहे. त्यामुळे आता या ७० टक्के पोलिसही गंभीर आजारी बनू लागले आहेत. त्यामुळे या बंदोबस्ताचे काय करायचा, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी बाहेरून रिझर्व्ह पोलीस आणण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहे.
- सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी
पोलीस बंदोबस्त कमी करण्यासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी मदत होणार आहे. त्यांनी जर पोलिसांना अत्यंत चांगल्या पध्दतीने सहकार्य केले तर पोलिसांच्यावरील बंदोबस्ताचा ताण निश्चित कमी होवू शकतो. सध्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे स्वतःलाच सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र ते त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमावेळी मात्र ते स्वतःलाच विसरून जातात. आणि पोलिसांचे काम कमी करण्यापेक्षा ते आणखीन वाढवून ठेवतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी पोलिसांना जर वेळेवर सहकार्य केले तर हा ताण निश्चितच कमी होवू शकतो.