...आता विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
अमलीपदार्थविरोधी मोहिमेची पुढील पायरी : नकाराधिकाराचाही हक्क
बेळगाव : अमलीपदार्थांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी सुरू केलेल्या अभियानाचा एक भाग म्हणून आता विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला असून महिनाभरानंतर ही तपासणी सुरू करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी ही माहिती दिली आहे. पोलीस दलाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. नववी, दहावीपासून कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी 10 टक्के विद्यार्थ्यांची रक्ततपासणी करण्याचा हा प्रस्ताव आहे. यासाठी अल्पवयीन मुलांची तपासणी करायची असेल तर त्यांच्या पालकांची परवानगी लागणार आहे. तरुणांच्या तपासणीसाठी त्यांची परवानगी घेतली जाणार आहे. अमलीपदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांवर गेल्या तीन महिन्यांपासून कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे.
आता प्रत्येक शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांपैकी 10 टक्के विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसंबंधी गौप्यता बाळगण्यात येणार आहे. या मोहिमेसंबंधी नागरिक व विद्यार्थ्यांनी बेळगाव पोलिसांच्या संकेतस्थळावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक सेमिस्टरमध्ये 10 टक्के विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्याचा प्रस्ताव आहे. दोन जिल्ह्यात ही मोहीम सध्या सुरू आहे. या तपासणीला विद्यार्थी नकारही देऊ शकतात. एखाद्या विद्यार्थ्याने गांजा किंवा अमलीपदार्थांचे सेवन केल्यानंतर किमान एक महिना त्याच्या रक्तात त्या अमलीपदार्थांचा अंश असतो. त्यामुळे जे अमलीपदार्थांच्या आहारी गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्वरित त्याचे सेवन सोडावे. पालकांनाही आपली मुले अमलीपदार्थांचे सेवन करतात, असा संशय असल्यास किट मागवून ते घरीही तपासणी करू शकतात. अमलीपदार्थांसंबंधी नागरिकांनी माहिती द्यावी. प्रत्येक शाळा-कॉलेजच्या आवारात किंवा गर्दीच्या ठिकाणी यासाठी क्युआर कोड लावण्यात येणार आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.