आता वेध नवरात्रोत्सवाचे
दुर्गा मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात : मंदिरांना आकर्षक सजावट
बेळगाव : गणेशोत्सव संपताच वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. एकीकडे दुर्गामाता दौड, दुसरीकडे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना त्याचबरोबर दांडिया व रास-गरबा कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने जय्यत तयारी केली जात आहे. नवरात्रोत्सव मंडळांनी मंडप घालण्यास सुरुवात केली असून मूर्तिकारांकडून दुर्गा मूर्तींना रंग दिला जात आहे.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. त्यामुळे बेळगावमधील महालक्ष्मी, दुर्गादेवी, यल्लम्मा देवी, मातंगी तसेच इतर देवींच्या मंदिरांमध्ये स्वच्छता केली जात आहे. भव्य दिव्य दुर्गामाता दौड काढण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. रास-दांडिया व गरबासाठी गुजराती समाजाकडून आयोजन करण्यात आले आहे. बेळगावमध्ये अनेक ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने मंडळांकडून मंडप घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच काही मंडळांनी गणेशोत्सवाप्रमाणे दुर्गादेवीचा आगमन सोहळा आयोजित केला आहे.
मूर्तिकार लागले कामाला
दुर्गा मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार रात्रंदिवस कार्यरत आहेत. यावर्षी दुर्गामूर्तींची संख्या वाढली आहे. केवळ बेळगावच नाही तर आसपासच्या ग्रामीण भागासोबत हुबळी, शिमोगा, मिरज, बैलहोंगल, हुक्केरी येथूनही दुर्गामूर्तींची ऑर्डर बेळगावच्या मूर्तिकारांना देण्यात आली आहे. दूरच्या मूर्ती लवकर तयार करण्यासाठी रंगकाम तसेच सजावट अंतिम टप्प्यात आली आहे.
बंगाली नागरिकांकडूनही दुर्गापूजन
दुर्गादेवीचे पूजन हे पश्चिम बंगाल व परिसरात मोठ्या प्रमाणात होते. सध्या बेळगावमध्ये गल्लोगल्ली दुर्गादेवींची प्रतिष्ठापना केली जात असली तरी बेळगावमध्ये राहणाऱ्या बंगाली लोकांकडूनही दुर्गादेवीची प्रतिष्ठापना अनोख्या पद्धतीने होते. बेळगावमध्ये सोन्याच्या व्यवसायात पश्चिम बंगालमधील कारागिरांची संख्या अधिक आहे. या कारागिरांकडून बंगाली पद्धतीने बेळगावमध्ये दुर्गादेवीचे पूजन केले जाते. हिंदवाडी व सांबरा या ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. दुर्गादेवीची मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते.
मूर्तींचे काम पूर्ण
दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे मूर्तींची मागणीही वाढली आहे. गणेशोत्सवानंतर दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली जात असल्याने तयारीसाठी काहीच दिवस मिळतात. त्यामुळे मर्यादित मूर्तीच तयार कराव्या लागतात. तसेच दुर्गादेवीला सजावट अधिक असल्यामुळे मूर्ती करण्यास विलंब लागतो. मूर्तींचे काम पूर्ण झाले असून आता रंगकामाला सुरुवात होणार आहे.
- विनायक मनोहर पाटील (मूर्तिकार)
अवघे तीन-चार दिवस शिल्लक
दुर्गादेवीच्या मूर्तींची मागणी यावर्षी वाढली आहे. गणेशोत्सव संपताच बेळगावमध्ये पावसाने जोर धरल्याने मूर्ती सुकल्या नसल्याने भट्टी तसेच मोठ्या व्होल्टेजचे बल्ब लावावे लागत आहेत. अवघे तीन-चार दिवस शिल्लक राहिल्याने रात्रंदिवस रंगकाम व सजावट करावी लागत आहे.
- भरत कुंभार (मूर्तिकार)