आता बसस्थानकातही मिळणार आरोग्य सुविधा
बेळगाव, चिकोडी बसस्थानकात नम्म क्लिनिक सुरू करण्याचा प्रस्ताव : आरोग्य खात्याचा पुढाकार
बेळगाव : राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात 65 नम्म क्लिनिक मंजूर करण्यात आली आहेत. यापूर्वीच 63 क्लिनिक विविध ठिकाणी कार्यरत आहेत. नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक व चिकोडी येथील बसस्थानकात ‘नम्म क्लिनिक’ कार्यान्वित करण्यासाठी आरोग्य विभाग पुढे आले आहे. या क्लिनिकचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार असून बसस्थानकात आरोग्य सुविधा मिळणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 36 तर दुसऱ्या टप्प्यात 29 नम्म क्लिनिक स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. क्लिनिकसाठी सार्वजनिक ठिकाणांना प्राधान्य देऊन जागेचा शोध घेण्यात येणार आहे. राज्य सरकारने आवश्यकतेनुसार 63 क्लिनिक यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहेत. बेळगाव व चिकोडी शहरात प्रत्येकी 9 क्लिनिक सुरू करण्यात आली असून त्या सोबतच बसस्थानकांमध्येही नम्म क्लिनिक सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. लवकरच क्लिनिक सुरू करून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
परिवहन मंडळही सकारात्मक
आरोग्य विभागाकडून परिवहन मंडळाकडे क्लिनिकबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिवहन विभागाच्या प्रमुखांच्या आरोग्याबाबतचे महत्त्व निदर्शनास आणून देण्यात आले आहे. परिवहन मंडळाकडे क्लिनिकसाठी मंजुरी देण्याची विनंती प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आरोग्य विभागाकडून उचलण्यात आले असून परिवहन मंडळानेही याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
क्लिनिकमध्ये एक डॉक्टर, लॅब टेक्निशियन, परिचारिका व ग्रुप डी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.नम्म क्लिनिकमध्ये रक्त व लघवीची मोफत चाचणी करण्यात येणार आहे. काही वेळा गरज पडल्यास नजीकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत. बहुतांश रुग्ण बीपी व मधुमेह तपासणीसाठी शहर परिसरात येत असतात. मात्र आता या चाचण्या नम्म क्लिनिकच्या माध्यमातून केल्या जाणार असून रुग्णांना याचा लाभ होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील मध्यवर्ती बसस्थानकात नम्म क्लिनिकची स्थापना केल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
