For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता महानगरातील लढतीकडे लक्ष

06:43 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता महानगरातील लढतीकडे लक्ष
Advertisement

महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसाठी तसेच, ठाणे, पालघर, कल्याण आणि भिवंडी या दहा जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून 10 जागांसाठी होणाऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यासाठी या 10 जागा म्हणजे अस्तित्वाची लढाई असणार आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत तर शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना ही घोषणा गेली अनेक वर्ष शिवसेनेच्यावतीने दिली जात होती मात्र या निवडणुकीत ठाणे कोणत्या शिवसेनेचे हे देखील स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या 10 जागांसाठी चांगलीच रणधुमाळी गाजणार आहे.

Advertisement

राज्यातील पाचव्या टप्प्यातील मुंबई आणि ठाण्यातील जागांचा तिढा शेवटच्या दिवसापर्यंत महायुती आणि महाआघाडीत कायम होता, अखेर हा तिढा सोडवण्यात युती आणि आघाडीच्या नेत्यांना यश आलेले असले तरी पक्षांर्तगत नाराजीची डोकेदुखी मात्र कायम आहे. मुंबईतील 10 जागांचा विचार करता यावेळी चार विद्यमान आमदार रिंगणात असून यात शिंदे गटाकडून रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव, तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि भाजपकडून मिहीर कोटेचा हे निवडणूक लढवित आहेत. या चार जणांपैकी मतदार कोणाला प्रमोशन देणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी एकही विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात नाही. 2014 च्या निवडणुकीत नगरसेवक असलेल्या राहुल शेवाळे यांनी थेट लोकसभा निवडणूक लढविली होती तर 2019 ला मनोज कोटक हे नगरसेवकचे थेट खासदार झाले होते. यावेळी मात्र कोटक यांचा पत्ता कापण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातून नगरसेवक राहिलेल्या आणि 2009 ची लोकसभा मनसेच्यावतीने लढविलेल्या वैशाली दरेकर या मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के हे शिंदे गटातून तर ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात लढत होत आहे. मुंबईतील सहा लढतीपैकी 3 ठिकाणी मशाल विरूध्द धनुष्यबाण अशी थेट लढत होत आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत विरूध्द शिंदे गटाच्या यामिनी जाधव या रिंगणात आहेत. सुरूवातीला महायुतीत ही जागा भाजपकडे जाईल असे वाटत असताना शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी ही जागा खेचली. दक्षिण मध्य मुंबईतही शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरूध्द ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होत असून धारावीच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र शिवसेना ठाकरे गटाने काही काँग्रेसला भिक घातली नाही. वायव्य मुंबईतील लढतही शिवसेना विरूध्द शिवसेना अशीच होत असून विद्यमान आमदार रवांद्र वायकर हे शिंदे गटाकडून तर याच मतदार संघातील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाकडून लढत असून, मुलगा ठाकरे गटात तर वडील शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. या मतदार संघातून काँग्रेसचे संजय निरूपम हे इच्छुक होते मात्र शिवसेनेने काही ही जागा सोडली नाही. शिवसेनेने मुंबईतील सहा जागांपैकी चार ठिकाणी आपले उमेदवार त्वरीत जाहीर केले. काँग्रेसचा मुंबईतील हक्काचा पारंपारिक मुस्लिम आणि बहुजन समाजातील मतदार हा आता काँग्रेसच्या मागे राहिलेला नाही. त्यात काँग्रेसचे संघटनही स्थानिक पातळीवर नसल्याने, ठाकरे यांनी काँग्रेसला भिक घातली नाही. काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोनच जागा सोडण्यात आल्या त्यातील उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो राम नाईक, गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघाचे दिर्घकाळ प्रतिनिधीत्व केले असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तर गोपाळ शेट्टी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल 4 लाख 65 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. आता काँग्रेसने या मतदार संघातून भुमिपुत्र असलेल्या भूषण पाटील यांना उमेदवारी दिलेली असली तरी पियुष गोयल यांच्यासमोर टिकुन राहण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे. प्रसिध्द वकील अॅड. उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपने तर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन आणि दाक्षिणात्य मतदारांची या मतदार संघात लक्षणीय संख्या असल्याने या मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे तर काँग्रेस नेते नसीम खान यांच्या नाराजीचा फटका वर्षा गायकवाड यांना बसू शकतो. त्यामुळे सहा लढतींचा विचार करता शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी तसेच भाजपसाठी या लढती प्रतिष्ठेच्या असताना काँग्रेससाठी मात्र आता अस्तित्वाची लढाई झाली आहे. शेजारच्या ठाणे लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे विरूध्द शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात लढत होत आहे, म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे पदाधिकारी नाराज असून नवी मुंबई, मिरा भाईंदर येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करताना राजीनामे दिले आहेत तर शेजारच्या कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातही भाजपच्या नेत्यांनी सुरूवातीला नाराजी दाखविल्याने ठाणे आणि कल्याण दोन्ही जागा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. भिवंडी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे विरूध्द भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यात लढत होत असली तरी काँग्रेचसे माजी खासदार सुरेश टावरे यांनी व्यक्त केलेली नाराजी जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांच्या उमेदवारीमुळे होणारे मतांचे विभाजन व या मतदार संघातील निर्णायक मुस्लिम मते कोणाकडे जातात यावर ही लढत ठरणार आहे. पालघर लोकसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी भाजपने माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांची उमेदवारी जाहीर केली. पेशाने डॉक्टर असलेल्या सावरा यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता आता त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी या निवडणूक लढवत असून पालघर लोकसभा मतदार संघातून प्रथमच महिलेला खासदारकीची उमेदवारी मिळाल्याने महिला वर्गाचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

प्रवीण काळे

Advertisement

Advertisement
Tags :

.