आता अपेक्षा रंगतदार लढतींची!
बघता बघता चॅम्पियन्स ट्रॉफीचा चित्रपट जवळपास मध्यंतरास येऊन ठेपलाय. हा चित्रपट कसा आहे याचे उत्तर आपल्याला आठ ते दहा दिवसात निश्चित मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर उपांत्य फेरीतील संभाव्य देशांची चर्चा जोर धरू पाहत होती. त्यातच भारत आणि न्यूझीलंड नक्कीच उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा होती. अर्थात या अपेक्षांना तडे जाऊ दिले नाहीत या दोन्ही संघांनी. कदाचित बांगलादेश वाघांनी मोठी डरकाळी दिली तर मोठी उलथापालथ होईल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु हे वाघ कागदावरच शोभून दिसले. दुसऱ्या ठिकाणी पाकिस्तानने आ बैल मुझे मार, म्हणून सुमार दर्जाचा खेळ केला. पाकिस्तानबद्दल काल-परवा सुनील गावसकर म्हणाले होते, भारताच्या ब संघालाही पाकिस्तान संघ हरवू शकत नाही. त्यांच्या तांत्रिक चुका त्यांनी उघड केल्या होत्या. परंतु या गोष्टीची त्यांना ना खेद ना खंत. पूर्ण स्पर्धेत पहिल्या विजयाची अक्षरश: भीक मागताना पाकिस्तान संघ फिरतोय. तो मिळेल की नाही याबाबत मी तरी साशंक आहे. पाकिस्तान सध्या तरी शेवटची घटका मोजते की काय अशीच शंका वाटू लागली आहे.
मी सुऊवातीला म्हटल्याप्रमाणे ब गट हा तगडा गट आहे. त्यातच अफगाणिस्तान हा संघ कधीही कुणालाही दे धक्का देऊ शकतो. तो धक्का देतो की नाही याचे उत्तर आपल्याला हा लेख वाचताना नक्कीच मिळेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका- ऑस्ट्रेलिया सामना वॉशआऊट झाल्यामुळे 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. एकीकडे दक्षिण आफ्रिका या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि जमलंच तर अंतिम प्रवेश करण्याचा मनसुबा त्यांचा निश्चितच असेल. उपांत्य फेरीतील मिस्टर चोकर्स हा डाग त्यांनी मागच्या स्पर्धेत काहीसा पुसून काढलाय हे तेवढेच खरं. ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केला तर स्टार कलाकाराविना त्यांचा खेळ कमालीचा बहरला आहे. आम्हीच 50 षटकांच्या झटपट क्रिकेटमधील राजे आहोत हे त्यांना सिद्ध करायचे आहे. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीचा विचार केला तर पाऊस त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. दोन वेळा पावसामुळे त्यांना उपांत्य फेरीत धडक मारता आली नव्हती. या सर्व गडबडीत अफगाणिस्तानने जादूची कांडी फिरवली तर तोही संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. अर्थात या झाल्या जर तरच्या कल्पना.
या पूर्ण स्पर्धेत सध्यातरी भारताकडून विराट कोहली, ऑस्ट्रेलियाकडून जोस इंग्लिश, न्यूझीलंडकडून पाकिस्तानमध्ये तिरंगी लढतीमध्ये रक्तबंबाळ झालेला रचीन रवींद्र ही मंडळी आपला किल्ला नेटाने लढवताना दिसतायत. 29 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने पाकिस्तानला चांगली संधी आली होती. परंतु सलग दोन पराभवामुळे तीही संधी पाकिस्ताने गमावली. म्हणतात ना देव देते आणी कर्म नेते, अशी परिस्थिती पाकिस्तानची झाली आहे. त्याचे उत्तर पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड देईल अशी आपण अपेक्षा करूया.
परंतु या स्पर्धेत विना पाकिस्तान संघाशिवाय स्थानिक प्रेक्षकांना कसे आकर्षित करायचे हे बिकट आव्हान पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आहे.
काय गंमत बघा, जिथे काही ऑस्ट्रेलियन खेळाडू सुरक्षेच्या कारणास्तव अप्रत्यक्षरीत्या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत. तरी त्यांच्या संघावर कुठलाच परिणाम झाला नाही. तर दुसरीकडे आपल्या देशात 29 वर्षानंतर एक मोठी आयसीसी क्रिकेट स्पर्धा होणार आहे हे माहीत असून सुद्धा आपल्या संघाची नीट आणि व्यवस्थित बांधणी करता आली नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय पाकिस्तानसाठी. या स्पर्धेतील वरवर दिसणारे पराभव भविष्यात पाकिस्तान क्रिकेटचे तीन तेरा वाजवून गेले तर आश्चर्य वाटू नये. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान बोर्डाने पाकच्या सुमार कामगिरीमुळे मानधनात कपात केली होती. त्यात अजून कपात झाली तर मात्र पाकिस्तानची ‘ना घर का, न घाटका’ अशी परिस्थिती होईल एवढ मात्र खरं!