मटकाबुकींवर आता तडीपारची कारवाई
न्यू गांधीनगर येथील एकावर तडीपारचा आदेश
बेळगाव : नशामुक्त बेळगावबरोबरच शहर व उपनगरात सुरू असलेल्या मटका व जुगारी अड्ड्यांवरही पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. मटका थोपविण्यासाठी मटकाबुकींना तडीपार करण्यात येत आहे. न्यू गांधीनगर येथील एका बुकीला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त व विशेष कार्यकारी दंडाधिकारी रोहन जगदीश यांनी गुरुवारी 10 जुलै रोजी तडीपारचा आदेश बजावला आहे. या कारवाईने मटका व जुगारी अड्डेचालकांचे धाबे दणाणले आहेत.
जावेद मोहम्मद शेख (वय 50) राहणार नुराणी गल्ली, न्यू गांधीनगर असे त्याचे नाव आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व हवालदार के. बी. गौराणी आदींनी यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांची मंजुरी घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयाला पाठविला होता. गुरुवारी विशेष दंडाधिकारीही असणाऱ्या पोलीस उपायुक्तांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून जावेदला सहा महिन्यांसाठी उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर माळमारुती, मार्केट, शहापूर पोलीस स्थानकात एकूण 8 गुन्हे नोंद आहेत. यापैकी 5 प्रकरणात त्याला दंडाची शिक्षा झाली आहे. एका प्रकरणात त्याची सुटका झाली असून आणखी दोन प्रकरणांची चौकशी सुरू आहे.