For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता सायबर गुन्हेगारही पोलिसांच्या गणवेशात!

12:47 PM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता सायबर गुन्हेगारही पोलिसांच्या गणवेशात
Advertisement

पोलीस ठाण्यासारख्या इमारतीत बसूनच करतात व्हिडिओ कॉल : सावधगिरी न बाळगल्यास फसवणूक ठरलेलीच

Advertisement

बेळगाव : तुमच्या नावे आलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ आढळून आले आहे, तुमच्या मुलाला अटक झाली आहे, न्यायालयातून तुमच्या नावे वॉरंट जारी झाला आहे, तुमच्या सीमकार्डचा वापर असंख्य गुन्ह्यांसाठी झाला आहे, असे सांगत असलेल्या तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या फोन कॉल्सकडे तुम्ही दुर्लक्ष केला नाही तर तुमची फसवणूक ठरलेलीच. कारण व्हिडिओ कॉल करणारे सायबर गुन्हेगार पूर्णपणे पोलिसांच्या गणवेशात असतात. बेळगावात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. प्रत्येक सावजासाठी एक नवी युक्ती शोधून त्याला गंडविले जाते. गेल्या 15 दिवसांपूर्वी तर गर्भवती महिलांसाठीचे पोषण ट्रॅकर अॅप हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. सायबर गुन्हेगारांच्या या कारवाईने बेळगावकर हैराण झाले आहेत.

पोलीस दलाच्यावतीने सातत्याने जागृतीची मोहीम राबवूनही फसवणुकीचे प्रकार मात्र थांबता थांबेनात. आता तर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करताना सावजाला ठकविण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या हुबेहूब सेटमध्ये बसून गुन्हेगार सावजाशी संपर्क साधतात. पोलीस गणवेशात राहूनच गुन्हेगार सावजाशी संपर्क साधतात. त्यामुळे खरोखरच आपल्या मागे पोलिसांचा शुक्लकाष्ट लागला आहे की काय? या भीतीने नागरिक गुन्हेगार सांगतील त्या खात्यावर रक्कम जमा करीत आहेत. खरे तर पोलीस, सीआयडी, सीबीआयचे अधिकारी कोणालाही थेट व्हॉट्सअॅप कॉल करून त्यांची चौकशी करीत नाहीत. वारंवार यासंबंधी सायबर क्राईम विभागाकडून जागृती करूनही परिस्थितीत काही फरक पडत नाही. व्हिडिओ कॉल करणारी व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात असते. पाठीमागे पोलीस ठाण्यासारखीच परिस्थिती असते. त्यामुळे सावज सहजपणे फशी पडत आहेत.

Advertisement

तुमच्या नावे न्यायालयाचा अटक वॉरंट जारी झाला आहे, तुमच्या मुलाला अटक झाली आहे, तो बलात्कार प्रकरणात अडकला आहे, थोड्या वेळात आम्ही त्याचा एन्काऊंटर करू, तुमच्या नावे आलेल्या कुरियरमध्ये अमली पदार्थ आढळून आला आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही वापरलेला पैसा पुन्हा भरला नाही, असे सांगत सावजांना गाठणारे सायबर गुन्हेगार त्यांना मोठ्या प्रमाणात चुना लावत आहेत. पोलीस दलाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार चालू वर्षी बेळगावात आतापर्यंत फसवणुकीचे 60 प्रकार घडले आहेत. गुन्हेगारांनी या घटनांत 8 कोटी 77 लाख 47 हजार 946 रुपयांना गंडविले आहे. यापैकी सायबर क्राईम विभागाने 3 कोटी 82 लाख 62 हजार 857 रुपये गोठविले आहेत. यापैकी फशी पडलेल्या नागरिकांना 60 लाख 71 हजार 479 रुपये परत करण्यात आले आहेत. ही आकडेवारी केवळ बेळगाव शहरापुरतीच आहे.

कर्नाटकाची राजधानी बेंगळूरमध्ये गेल्या 9 महिन्यांत सावजांना 65 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. रोज फसवणुकीचे एक-दोन प्रकार सुरूच आहेत. दोन महिन्यांभरापूर्वी बॉक्साईट रोड येथील एका रहिवाशाला सायबर गुन्हेगारांचा व्हिडिओ कॉल आला होता. बलात्कार प्रकरणात तुमच्या मुलाला अटक झाली आहे. थोड्या वेळात आम्ही त्याला संपविणार आहे. त्याला वाचवायचे असेल तर आम्ही सांगेन त्या बँक खात्यावर तातडीने 10 लाख रुपये जमा करा असे धमकाविण्यात आले होते. आपला एकुलता एक मुलगा बलात्कार प्रकरणात अडकला आहे. थोड्या वेळात त्याची एन्काऊंटर होणार आहे, हे ऐकून वडिलांना धक्का बसला. व्हिडिओ कॉलवर त्यांनी सायबर गुन्हेगारांना हात जोडून विनवणी केली. सध्या आपल्याजवळ पैसे नाहीत, काही तरी करून पैसे जमा करतो, माझ्या मुलाला सोडून द्या, अशी विनवणी करू लागला. थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीने दुसऱ्या मोबाईलवरून मुलाशी संपर्क साधला. मुलाने तिचा फोन उचलला, मी सुखरुप आहे मला काही झाले नाही. थोड्या वेळात आपण घरी पोहचू असे त्याने सांगितल्यामुळे या दाम्पत्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र याच धक्क्यातून केवळ महिन्याभरात वडिलांचा मृत्यू झाला.

गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान

पूर्वी तुमचे एटीएम ब्लॉक झाले आहे, ते सुरू करण्यासाठी एटीएम कार्डवरील क्रमांक सांगा असे सांगत बँक खात्यातील रक्कम हडप केली जात होती. आता सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट हा धोकादायक मार्ग पत्करला आहे. सायबर गुन्हेगारांच्या नादी लागून काही जणांनी दोन ते तीन दिवस एकाच खोलीत स्वत:ला कोंडून घेतल्याचीही उदाहरणे आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधून ही कृत्ये केली जात असली तरी गुन्हेगारांचे आयपी अड्रेस मात्र दुबई, कम्बोडियातील असल्याचे दिसते. त्यामुळे सायबर क्राईम विभागासमोरही असे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सावधगिरी बाळगा...फसवणूक टाळा

सायबर गुन्हेगारांविषयी देशभरात जागृती करण्यात येत आहे. फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पोलीस, सीबीआय, सीआयडीचे अधिकारी गुन्हेगारांना थेट व्हिडिओ कॉल करत नाहीत, ही गोष्ट माहीत असल्यास आपली फसवणूक होणार नाही. मात्र अनेकजण याची कल्पना असूनही सायबर गुन्हेगारांच्या धमकीच्या फोन कॉलनंतर घाबरून जातात, अशी स्थिती आहे.

खास करून अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे सांगून थोड्या वेळात मुंबईहून तुमच्या घरी पथक पाठवितो, गावात तुमची बेअब्रू व्हायची नको असेल तर ऑनलाईन चौकशीला सामोरे जा, यासाठी डिपॉझिट म्हणून 10 ते 25 लाख रुपये भरा, चौकशीत तुम्ही निर्दोष आढळलात तर तुमचे पैसे परत केले जातील, दोषी ठरलात तर ते गोठविले जातील, असे सांगत सावजाला विचार करण्यासही संधी न देता त्यांची फसवणूक केली जाते. आता तर पोलीस ठाण्यासारख्या इमारतीत बसून गुन्हेगार सावजाला ठकवत आहेत. पोलीस दलासमोर या गुन्हेगारांनी मोठे आव्हान उभे केले असून स्वत: सावधगिरी बाळगली तरच फसवणूक टळणार आहे.

Advertisement
Tags :

.