आता दररोज करता येणार बेळगाव-दिल्ली प्रवास
6 ऑक्टोबरपासून विमान फेरी पूर्ववत
बेळगाव : देशाच्या राजधानीत बेळगावमधून आता दररोज विमान प्रवास करता येणार आहे. मागील काही दिवस आठवड्यातून तीन दिवस असलेली सेवा आता पुन्हा दैनंदिन करण्यात आल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. अवघ्या अडीच तासामध्ये बेळगाव ते दिल्ली असा प्रवास करता येणार असल्याने बेळगावसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्ली गाठता येणार आहे. चार वर्षांपूर्वी बेळगावमधून दिल्लीसाठी इंडिगो एअरलाईन्सने विमान फेरी सुरू केली. या विमान फेरीला सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळत गेला. दररोज 100 ते 120 प्रवासी दिल्लीहून बेळगावला तितकेच प्रवासी परतीचा प्रवास करत होते. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, एअरमन ट्रेनिंग स्कूल, कोब्रा ट्रेनिंग स्कूल या लष्करी तळांसह केएलई, एकस, औद्योगिक वसाहती असल्यामुळे प्रवाशांची दररोज ये-जा असते. मध्यंतरी दिल्ली येथे स्लॉट मिळत नसल्याने विमान फेरी आठवड्यातून तीन दिवस करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवाशांना बेळगाव ते हैद्राबाद व तेथून दिल्ली असा प्रवास करावा लागत होता. सोमवार दि. 6 ऑक्टोबरपासून पुन्हा विमानफेरी पूर्ववत करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
दररोज 90 ते 95 टक्के प्रवासी
बेळगाव-दिल्ली विमानफेरी आता दररोज सुरू करण्यात आली आहे. दिवाळी, दसरा असे उत्सवाचे दिवस असल्याने दररोज 90 ते 95 टक्के प्रवाशांची ये-जा सुरू आहे. 6 ऑक्टोबरपासून विमानफेरी दैनंदिन करण्यात आली असून आता प्रवाशांची गैरसोय टाळता येणार आहे.
- त्यागराजन (संचालक, बेळगाव विमानतळ)