आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी
पहिले मानवी सुरक्षा परीक्षण यशस्वी
पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळीच्या दिशेने एक मोठे यश मिळाले आहे. वायसीटी-529 नावाच्या या नव्या गोळीने पहिले मानवी सुरक्षा परीक्षण यशस्वी केले आहे. ही गोळी हार्मोनशिवाय पुरुषांमध्ये शुक्राणू निर्माण करण्याची प्रक्रिया रोखते, या गोळीच्या सेवनानंतर कुठल्याही व्यक्तीत दुष्परिणाम दिसून आले नाहीत. आता या गोळीसंबंधी विस्तृत परीक्षण केले जाणार असून त्यात सुरक्षा आणि प्रभावाची पडताळणी होईल. पुरुषांसाठी वायसीटी-529 ही गोळी नवा आणि सोपा पर्याय ठरणार आहे. महिलांच्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये हार्मोन असतात, जे अनेकदा दुष्परिणाम म्हणजेच मूड स्विंग्स किंवा वजन वाढविण्यासारखे परिणाम दाखवतात, वायसीटी-529 मध्ये असे होणार नाही. ही गोळी पुरुषांच्या शरीरात शुक्राणू निर्माण करण्याची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद करणार आहे. गोळीचे सेवन रोखल्याच्या 4-6 आठवड्यांमध्ये पुरुषांची प्रजननक्षमता पूर्ववत होणार आहे.
कम्युनिकेशन्स मेडिसिन या नियतकालिकात या परीक्षणाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीने ही गोळी विकसित केली आहे. यूअरचॉइस थेरप्युटिक्स कंपनी याचे परीक्षण करत आहे.
मानवी शरीरात एक प्रोटीन असते, ज्याला रेटिनॉइक अॅसिड रिसेप्टर अल्फा म्हटले जाते. हा प्रोटीन प्रजननक्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावतो. तर वायसीटी-529 गोळी ही प्रजननक्षमता काही काळापुरती रोखते. वैज्ञानिकांनी या गोळीच्या निर्मितीकरता रेटिनॉइक अॅसिड रिसेप्टरच्या संरचनेला अधिक जाणून घेतले. अनेक अणूंचे परीक्षण करत योग्य औषध निर्माण करण्यात आले आहे.
पहिले परीक्षण 16 पुरुषांवर (32-59 वयोगट) करण्यात आले. यात ही गोळी शरीरात योग्य प्रमाणात पोहोचते का, यामुळे कुठले गंभीर दुष्परिणाम होतात का हे पाहिले गेले. परीक्षणात काही पुरुषांना प्लेसीबो (औषध नसलेली गोळी) देण्यात आले, तर काही जणांना कमी डोस (90 मिलिग्रॅम) आणि काही जणांना अधिक डोस (180 मिलिग्रॅम) देण्यात आला. काही जणांनी रिकाम्या पोटी गोळीचे सेवन केले, तर काहींनी खाल्ल्यावर गोळीचे सेवन केले होते. सर्व पुरुषांच्या शरीरात डोस योग्य प्रमाणात पोहोचला, 180 मिलिग्रॅमचा डोस सर्वात प्रभावी होता. या गोळीमुळे दुष्परिणाम दिसून आलेला नाही. हार्मोन बदलले नाहीत, तसेच मूडही बिघडला नाही. गोळी दिवसात कितीवेळा घ्यावी लागणार हे पुढील परीक्षणानंतर ठरणार आहे.
प्राण्यांवरही परीक्षण
यापूर्वी वायसीटी-529 चे परीक्षण उंदीर आणि माकडांवर करण्यात आले होते. उंदरांनी गोळीचे सेवन केल्याच्या 4 आठवड्यांमध्ये प्रजननक्षमता रोखली गेली. तर गोळी बंद केल्याच्या 4-6 आठवड्यांमध्ये प्रजननक्षमता परतली. तर माकडांमध्ये 2 आठवड्यांमध्येच शुक्राणूंची संख्या अत्यंत कमी झाली. गोळी बंद केल्याच्या 10-15 आठवड्यांमध्ये पूर्ण प्रजननक्षमता परतली.