नोव्हेंबर 23: पुढील राजकारणाची दिशा ठरवणार
हरयाणामधील भाजपच्या अनपेक्षित हॅटट्रिकने देशाच्या राजकीय पटलावर एक गुगली टाकण्याचे काम केलेले आहे. आता पुढे काय घडणार? याबाबत साशंकता विरोधी पक्षात निर्माण झालेली आहे. इंडिया आघाडीत चलबिचल सुरु झालेली आहे.
हरयाणात काँग्रेसच्या अचानक पराभवाने भरवशाच्या म्हशीला टोणगा झालेला आहे. त्यामुळे ही चलबिचल साहजिक आहे. राजकारणाचे असेच असते. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असा प्रकार. कोणत्या पक्षाची किती इज्जत ती पूर्णपणे त्याच्या निवडणुकीतील कामगिरीवर. त्यामुळे कालपर्यंत देशाची एकमेव आशा राहुल गांधी आहेत असे वाटणाऱ्यांना त्यांच्यावर मारलेले टोमणे ऐकायची वेळ आलेली आहे. एकीकडे काँग्रेसपुढील आव्हाने संपण्याची चिन्हे नाहीत तर दुसरीकडे भाजपला केवळ काँग्रेसचीच भीती आहे असे ऊन पाऊसाचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना हरयाणाने परत उभारी आणलेली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडबरोबर दिल्लीची निवडणूक जाहीर झालेली नसल्याने अरविंद केजरीवाल यांचा वेगळा समाचार जानेवारीत घेण्याचा त्यांचा विचार दिसत आहे. मोदी-शहा यांना महाराष्ट्राचे गणित जमले तर देशाची राजकीय हवाच पालटेल असे समजले जात आहे, त्यात वावगे असे काही नाही. दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकांबरोबर विविध राज्यातील पोटनिवडणुकादेखील होत आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 9 पोटनिवडणुका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात भाजप मुसंडी मारू शकतो का तसेच उत्तरप्रदेशमधील या पोटनिवडणुकांत भाजप काय कामगिरी दाखवतो त्यावर देशाच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. झारखंडमध्ये भाजपने बऱ्यापैकी बस्तान बसवले असल्याने त्याचे सारे लक्ष्य हे महाराष्ट्रावर केंद्रित आहे. महाराष्ट्राची निवडणूक हरयाणाबरोबर घेण्याचे मोदी-शहा यांनी टाळून विरोधकांसमोर एक आव्हान उभे केलेले आहे. त्यांना झारखंडची फारशी फिकीर नाही. ते आपल्या झोळीत पडेल असा त्यांचा होरा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात जोरदार रणकंदन होणार आहे. एक प्रकारे 288 लढाया होणार आहेत. त्यात मोदी-शहा सर्व प्रकारच्या अस्त्रांचा वापर करून महाविकास आघाडीला ‘दे माय धरणी ठाय’ करायचा प्रयत्न करतील. मोदींचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर उदयाला येऊन एक दशक उलटले तरी भाजपला महाराष्ट्रात पक्की मांड बसवता आलेली नाही. मोदी-शहा यांच्या ‘वापरा आणि फेका’ या नीतीने राज्यातील राजकीय पक्ष हे हैराण झालेले आहेत. भाजपची ‘शत-प्रतिशत’ घोषणा जुनीच आहे तीत इतर कोणत्याच पक्षाला काहीच स्थान नाही आहे.
एकीकडे विरोधकांवर मुलुख मैदान तोफ भाजपने रोखलेली आहे तर त्याच्या मित्रपक्षांची अवस्था देखील फारशी निराळी नाही. शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता तुम्ही त्याग दाखवण्याची वेळ आलेली आहे, असे सांगितले याचा अर्थ भाजपला 288 पैकी 170 जागा लढवून शिंदे यांची सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 100च्या आत गुंडाळावयाचे आहे. दुसरीकडे मोठमोठ्या जाहिरातींचा सपाटा लावून युती जिंकली तर पुढील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच हा संदेश भाजप स्पष्टपणे देऊ लागलेली आहे. याचा एक अर्थ असा की महाराष्ट्रातील निवडणूक ही भाजपलादेखील सोपी नाही. मोदी-शहा यांनी मित्र पक्षांना सत्तेची चटक लावलेली आहे. आता त्यांना बाजूला व्हायला सांगणे कितपत रुचणारे आहे? मुख्यमंत्रीपद गेल्यावर शिंदे यांची कवचकुंडलेच गायब होणार आहेत. त्यामुळे केवळ त्यांचा रथ चिखलात रुतणार की महायुतीचा? हे दिसणार आहे. राजकारण संत मंडळींचे नसते. प्रत्येकाचा ‘प्लॅन बी’ तयार असतो. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना आघाडीच्या घटकपक्षांपेक्षा केवळ 25 लाख मतेच कमी पडलेली आहेत आणि ती कोणत्याही तऱ्हेने परत मिळवता येतील हा भाजपचा दावा येती लढाई आपण सर्वार्थाने जिंकू अशी बढाई मारण्यासारखा आहे. विरोधकांना दमात उखडण्याचा प्रकार सुरु झाला आहे. हरयाणात मोदींचा महाविजय झाला असे मानले तर जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला असेच मानावे लागेल. जम्मू आणि काश्मीरमधील निवडणूक ही राष्ट्रीयदृष्ट्या जास्त महत्त्वाची असल्याने तेथील पराभव म्हणजे भाजपकरता वाईट दिवस सुरु झाले आहेत, असा होतो असा विरोधकांचा युक्तिवाद आहे तो सर्वस्वी गैरलागू नाही. वादग्रस्त 370 कलम हटवल्यानानंतर भाजपला खोऱ्यातील एकही जागा जिंकता आलेली नाही.
उत्तरप्रदेशमधील विधानसभेच्या 9 पोटनिवडणुकादेखील देशात राजकीय वारे कसे वाहत आहेत ते दाखवणार आहे. योगी आदित्यनाथ आणि भाजपचे हिंदुत्व यांच्या अचानक पीछेहाटीने लोकसभेच्या निवडणुकीत तिथे भाजपचे पानिपत झाले होते. त्यामुळे 2027च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत योगी सरकार कशा पद्धतीने चालणार ते या पोटनिवडणुकीतून दिसणार आहे. या पोटनिवडणुकात भाजपला झटका बसला तर राष्ट्रीय स्तरावर त्यांचे परिणाम होणार आहेत. योगी यांच्या विरोधात राज्य भाजपमध्ये सुरु झालेला असंतोष सध्या तरी शांत झालेला दिसत आहे. अयोध्येच्या संसदीय मतदारसंघाचा भाग असलेल्या मिल्कीपूर या मतदारसंघातील पोटनिवडणूक काहीतरी कारण सांगून पुढे ढकलली गेली आहे, त्याने भाजपमधील धास्तीच दिसून येत आहे.
नजीकच्या भविष्यकाळात मोदींना मित्रपक्षांकडून त्रास संभवत नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधानांची जी भरभरून स्तुती केली त्याचा अर्थ म्हणजे आघाडीत सारे काही आलबेल आहे. 74 वर्षाच्या चंद्रबाबूंना त्यांच्या मुलाला 41-वर्षाच्या नारा लोकेशला पुढील मुख्यमंत्री करावयाचे आहे त्याकरिता ही साखरपेरणी सुरु आहे. बिहारच्या नितीश कुमार यांनी 9वेळेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक विक्रम केलेला आहे. पुढील वर्षीच्या शेवटाला बिहारची निवडणूक आहे. तोवर केंद्राकडून भरपूर पदरात पाडून घेण्याचा एकमेव उद्योग ते करणार आहेत. अशा वेळेला हरयाणाच्या विजयातून मोदींना असीम बळ मिळालेले आहे.
हरयाणाच्या अनपेक्षित झटक्याने राहुल गांधी सावध झाले आहेत. त्यांनी अशोक गेहलोत सारख्या ज्येष्ठ नेत्यांची महाराष्ट्रात पाठवणी केलेली आहे. निवडणूक लढवण्याचे एक शास्त्र असते ते फार गहन असते. विरोधकांमध्ये यातील पारंगत व्यक्ती म्हणजे शरद पवार हे होत. राहुल गांधी हे मोठे नेते असतील पण निवडणूक लढवताना मोदी-शहा हे साम, दाम, दंड, भेदाचा वापर करतात हे त्यांना अजून नीट उमगलेले नाही. भाजपला नामोहरम करावयाचे असेल तर बाजीरावासारखे गतिशील बनून विरोधकांना खिंडीत पकडण्याचे काम करावे लागेल. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचा एकमेव नेता म्हणून राहुल उदयाला आले असले तरी त्यांच्याकडे सल्लागार मंडळींची वानवा आहे. ज्यादिवशी राहुलना कोणी ‘नाना फडणवीस’ भेटेल त्यादिवसापासून मोदी-शहांचा ग्राफ हा उतरणीला लागणार आहे. आलेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी राहुल, शरद पवार व उद्धव ठाकरे या तिघांनी भावी रणनीती आखणे जरुरीचे आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींनी 18प्रचारसभा घेऊनदेखील भाजप व मित्र पक्षांना केवळ 17 जागा मिळाल्या हे महाराष्ट्राचे वास्तव 4-5 महिन्यांपूर्वी होते ते आता कितपत बदललेले आहे? याविषयी उलटसुलट चर्चा होऊ शकते. पण लाडक्या बहीण योजनेसह एव्हढ्या योजनांचा गेल्या काही काळात पाऊस पाडण्यात आलेला आहे की त्याने सारे नरेटिव्ह बदलण्याचा प्रयास झालेला आहे. महाराष्ट्रात कोण कोणाचे पानिपत करणार?, कोण कोणाचे कात्रज करणार? त्यावर राष्ट्राची राजकीय दिशा भावी काळात कशी राहणार ते दिसणार आहे. या निवडणुकीने महाराष्ट्रालाच एका खिंडीत पकडले आहे असे म्हणणे वावगे होणार नाही.
सुनील गाताडे