कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

14 नोव्हेंबर : कोणाचा घातवार ठरणार?

06:33 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यावेळचा 14 नोव्हेंबर पंडित नेहरूंचा जन्मदिन असल्याने ‘बाल दिन’ म्हणून पाळला जाणारच, पण त्याच दिवशी देशातील विशेषत: उत्तर भारतातील राजकीय वारे कसे वाहणार ते कळणार आहे. अतिशय चुरशीने लढवल्या जात असलेल्या 243सदस्यीय बिहार विधानसभेचे निकाल त्यादिवशी जाहीर होणार आहेत.  कधीकाळी भगवान बुद्ध आणि महावीराची भूमी असलेले बिहार हे देशातील अतिशय गरीब राज्य आहे पण त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या अतिशय सजग.

Advertisement

नुकत्याच पार पडलेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत झालेल्या विक्रमी मतदानाने भाजपची नैया डुबू लागली आहे काय? असे प्रश्न एकीकडे विचारले जात आहेत तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांना नुकत्याच दिलेल्या आर्थिक सहाय्याने विरोधकांना ठेंगा दाखवला आहे असेही सांगितले जात आहे. साधनांची कमतरता नसलेल्या भाजपने या निवडणुकीत मतदारांना रिझवण्याचे अजिबात कमी केलेले नाही. महाराष्ट्, दिल्ली आणि हरयाणातील निवडणुका जिंकल्याने बिहार निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता अजूनच प्रतिष्ठेची झालेली आहे. साम-दाम-दंड-भेद अशी सारी नीती वापरून विरोधकांना प्रत्येक रिंगणात धूळ चारण्याची जगातील सर्वात मोठ्या पक्षाची मनीषा एव्हाना सगळ्यांना कळून आली आहे. यावेळेला निवडणुकीच्या अगोदरच लालू यादव आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध सरकारी तपास यंत्रणा परत कामाला लागल्या यात नवल नाही. जातीपातीच्या राजकारणाकरता प्रसिद्ध असलेले बिहारमधील विविध समाजांची रालोआ आणि महागठबंधन या प्रतिस्पर्धी आघाड्यातील पाठिंबा बघितला तर भाजप प्रणित रालोआ ही काकणभर सरसच.

Advertisement

महाराष्ट्राच्या धर्तीवर बिहारमधील महिलावर्गाला खुश करण्यासाठी 10,000 रुपयांचे दोन हप्ते तेथील महिलांना देण्यात आलेले आहेत आणि त्याने काम केले तर महिलावर्ग रालोआला जिंकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा ठाम विश्वास एका वर्गाला आहे. राहुल गांधी यांनी ‘एच फाइल्स’ सादर करून हरयाणातील निवडणूक भाजपने एक मोठे फ्रॉड करून जिंकलेली आहे, असा केलेला आरोप सामान्य बिहारी माणसाला सावध करत आहे, असे सांगितले जात आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत लालू यादव यांच्या राजदला 76 जागा मिळून सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. 75 जागा पटकावून भाजप दुसऱ्या स्थानावर होती. गेल्या निवडणुकीत रालोआला महागठबंधन पेक्षा केवळ 35,000 मते जास्त पडली होती पण ती ज्या पद्धतीने पडली त्याने इतिहास बनवला होता. या निवडणुकीत भाजपने स्वत:ला झोकून दिलेले आहे. ‘हे मैदान मारायचेच’ असे मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ठरवलेले दिसतेय. पण निकाल काय लागणार यात बरेच किंतु परंतु आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंघ आहे काय? याबाबत बरेच तर्कवितर्क आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची एकही संयुक्त जाहीर सभा झालेली नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये काहीतरी बिनसलेले आहे, अशी चर्चा वाढीस लागली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे नितीश यांची येती निवडणूक शेवटचीच असा अनुमान लावल्याने भाजप पुढील मुख्यमंत्री आपला बनवण्यासाठी कामाला लागली आहे. नितीश यांना निवडणुकीनंतर ‘एकनाथ शिंदे’ बनवण्याचा भाजपचा विचार स्पष्ट दिसत आहे. विरोधी महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हे राजदचे तेजस्वी यादव हे आहेत हे जाहीर झालेले आहे. ‘तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण?’ असा प्रश्न विचारून विरोधक भाजपला भंडावत आहेत.

तऱ्हेवाईक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध जी आघाडी उघडली आहे आणि त्यामुळे पंतप्रधान जबर अडचणीत आलेले आहेत असे चित्र दिसत असताना ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपला ती खास महत्त्वाची वाटत आहे. ‘अगा काही घडलेच नाही’, असे दाखवण्याचा सत्ताधाऱ्यांचा एकीकडे प्रयत्न आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सांभाळण्याचा नाजूक डाव खेळला जात आहे. भारतीय राजकारणातील नितीश हे एक वेगळेच प्रकरण आहे. गेली 20 वर्षे ते ध्रुवताऱ्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून अढळ राहिलेले आहेत. त्यांचे फक्त विरोधक बदललेले आहेत. लालू यादव यांचे राष्ट्रीय जनता दल कधी त्यांचे समर्थक राहिले आहे तर कधी विरोधक. तीच गोष्ट भाजपची आणि काँग्रेसची देखील आहे. आपल्याला वजा करून भाजप अथवा राजद/काँग्रेसला राजकारणच करता येणार नाही अशी व्यवस्था नितीशने केलेली आहे.

त्यामुळे निवडणुकीनंतर नितीश हे मुख्यमंत्री राहणार अथवा नाही? हा प्रश्न सध्यातरी म्हटले तर दुय्यम आहे आणि म्हटले तर कळीचा आहे. निवडणुकीच्या नंतर नितीशबरोबर भाजप दिसणार की राजद आणि तेजस्वी यादव यांच्याबरोबर? याबाबत उलटसुलट तर्कवितर्क राजकीय वर्तुळात मांडले जात आहेत. निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळूनदेखील तो पक्ष विरोधी बाकावर बसलेला दिसू शकतो, असा एक युक्तिवाद मांडला जात आहे. भाजपने गेल्या काही महिन्यात नितीशकुमार यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाहेर ठेवण्याचे राजकारण वेगवेगळया रीतीने केले हे लपून राहिलेले नाही. वेड पांघरून पेडगावला जाण्याबाबत नितीश तरबेज आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर नितीश यांच्या मर्जीत भाजप राहणार की नाही? या प्रश्नावर पुढील घडामोडी अवलंबून आहेत.

नितीश यांना कमजोर करण्यासाठी भाजपने गेल्या निवडणुकीपासून जोरदार काम केले. 2020च्या निवडणुकीत चिराग पासवान यांचा शिताफीने वापर करून त्यांनी संयुक्त जनता दलाला केवळ 43 जागांवर आणले. आता या निवडणुकीत तेच काम प्रशांत किशोर करणार काय? अशी पाल चुकचुकत आहे. बिहार ढवळून काढलेले किशोर आणि त्यांचा जन सुराज पक्ष हे निवडणुकीत तिसरी शक्ती म्हणून उदयाला येणार काय? यावर बिहारमधील बरेच राजकीय गणित अवलंबून आहे. गेल्या तीस  वर्षात बिहारमध्ये उदयाला आलेले किशोर हे पहिले उच्चवर्णीय नेता आहेत. ते जे नरेटिव्ह मांडत आहेत त्याने भाजपाला जास्त त्रास होणार आहे, असे एक गट दावा करत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून एकही मोठी इंडस्ट्री बिहारमध्ये का आली नाही आणि केवळ गुजरातचीच त्यांनी भर का केली? असा खडा सवाल किशोर तसेच तेजस्वी विचारत आहेत. याविरुद्ध दुसरा गट मात्र किशोर हे नितीश यांना काटून भाजपला मदत करण्याचे राजकारण करत आहे असे म्हणत आहे. त्याच्या मते किशोर हे भाजप ची ‘बी’ टीम आहे.

बिहारला केवळ मजूर पुरवणारी फॅक्टरी म्हणून भाजप बघते, या विरोधकांच्या आरोपाने सत्ताधारी घायाळ झालेले दिसत आहेत. निवडणुकीत प्रचाराचा जोर पकडल्यानंतर बिहारचा आपण कसा विकास करू आणि तेथील मजुरीकरताचे  पलायन कसे थांबवू याबाबत सत्ताधारी पक्ष प्रथमच बोलू लागला आहे. बिहारच्या जातीय राजकारणात ब्राह्मण, राजपूत, बनिया, वगैरे उच्च जाती या सध्या भाजपबरोबर आहेत. त्यांना स्वत:चा असा नेता अजून मिळालेला नाही. भाजप हा उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी या मागासवर्गीय नेत्याला पुढे आणत आहे. पण तो कितपत यशस्वी होणार हे अजून प्रश्नचिन्ह आहे. नितीश कुमार यांच्या सावलीतून कोणाही भाजप नेत्याला गेल्या 20 वर्षात पुढे येता आलेले नाही, हा इतिहास आहे. थोडक्यात काय भाजपला बिहारचा ‘योगी आदित्यनाथ’ यांच्यासारखा तालेवार नेता अजूनही मिळत नाही आहे.

बिहारमध्ये काय घडणार? याचे राष्ट्रीय पडसाद उमटणार आहेत. मोदींचे नाणे पहिल्यासारखे खणखणीत राहिले नाही आहे ते आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे दिसून येत आहे. अशावेळी देशांतर्गत त्यांना आपले वजन कसे अजिबात कमी झालेले नाही हे दाखवण्याचा मार्ग बिहारच्या निवडणुकीतील निकालाद्वारे मिळणार आहे. विरोधकांनी कंबर कसल्याने भाजपला प्रत्येक जागेकरता तगडा मुकाबला करावा लागत आहे. एकेकाळी ‘संपूर्ण क्रांती’ चा नारा देत सारे राष्ट्रीय चित्र बदलवणारा बिहार या निवडणुकीत काय संदेश देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article