For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोव्हॅक जोकोविच, अलेक्झांडर व्हेरेव्ह, गॉफ, तिसऱ्या फेरीत

06:05 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोव्हॅक जोकोविच  अलेक्झांडर व्हेरेव्ह  गॉफ  तिसऱ्या फेरीत
Advertisement

अमेरिकन ओपन टेनिस : आर्यना साबालेन्का, अझारेन्का, झेंग किनवेन, मॅडिसन कीज यांचीही आगेकूच

Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह,  महिला एकेरीची विद्यमान विजेती अमेरिकेची कोको गॉफ, द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्का, मॅडिसन कीज, चीनची झेंग किनवेन, बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. विद्यमान विजेत्या जोकोविचने आपलाच देशवासी लॅजलो डेअरचा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. जोकोविचने पहिले दोन सेट 6-4, 6-4 असे जिंकून तिसऱ्या सेटमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली असताना लॅजलोने दुखापतीमुळे सामना सोडून दिला. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत लॅजलोला हरविण्यासाठी जोकोविचला पाच सेट्स झुंजावे लागले होते. त्याची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सी पॉपीरिनशी होईल. जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने तिसरी फेरी गाठताना अॅलेक्झांडर म्युलरचा 6-4, 7-6 (7-5), 6-1 असा पराभव केला. चौथे मानांकन असलेल्या व्हेरेव्हने या सामन्यात 15 बिनतोड सर्व्हिस केल्या.

Advertisement

महिला एकेरीत अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित कोको गॉफने जर्मनीच्या बिगरमानांकित ताताना मारियाचा 6-4, 6-0 असा धुव्वा उडवित आगेकूच केली. पहिल्या सेटमध्ये गॉफकडून बऱ्याच चुका झाल्या होत्या. तिसऱ्या फेरीत तिची लढत युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाशी होईल. अन्य एका सामन्यात आर्यना साबालेन्काने तिसऱ्या फेरीतील स्थान निश्चित करताना लुसिया ब्रॉन्झेटीचा 6-3, 6-1 असा पराभव केला. साबालेन्काने पॉवरफुल सर्व्हिस करीत पाच बिनतोड सर्व्हिस केल्या. तिने गेल्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेआधी तिने सिनसिनॅटी ओपन स्पर्धा एकही सेट न गमविता जिंकली आहे.

बेलारुसच्या अझारेन्काला तिसरी फेरी गाठताना संघर्ष करावा लागला. मायग्रेनच्या त्रासावर मात करीत तिने तिसरी फेरी गाठताना क्लारा ब्युरेलचा 6-1, 6-4 असा पराभव केला. सामन्यावेळी मायग्रेनचा त्रास होऊ लागल्याने तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. यासाठी पाच मिनिटे खेळ थांबला होता. चीनच्या वांग यफानशी तिची पुढील लढत होईल. अन्य एका सामन्यात चीनची ऑलिम्पिक सुवर्णविजेती झेंग किनवेननेही आगेकूच केली असून तिने एक सेटची पिछाडी भरून काढत रशियाच्या एरिका अॅन्ड्रीव्हावर 6-7 (3-7), 6-1, 6-2 अशी मात केली. एरिका ही मायरा अॅन्ड्रीव्हाची मोठी बहीण आहे. झेंगची पुढील लढत जर्मनीच्या ज्युल नीमीयरशी होईल. अमेरिकेच्या 14 व्या मानांकित मॅडिसन कीजने ऑस्ट्रेलियाच्या माया जॉईंटचा 6-4, 6-0 असा धुव्वा उडवित आगेकूच केली. तिची लढत 33 व्या मानांकित बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सशी होणार आहे.

युकी भांब्री, श्रीराम बालाजी यांची दुहेरीत विजयी सलामी

भारताचा युकी भांब्री आणि एन. श्रीराम बालाजी यांनी आपापल्या साथिदारांसमवेत पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली. युकी भांब्री व फ्रान्सचा अल्बानो ओलिव्हेटी यांनी वाईल्डकार्डधारक पॅट्रिक ट्रहॅक-रेयान सेगरमन या अमेरिकन जोडीवर 6-3, 6-4 अशी मात केली. श्रीराम बालाजी व अर्जेन्टिनाचा गिडो आंद्रेवझी यांनी संघर्षपूर्ण विजय मिळविताना न्यूझीलंडचा मार्कस डॅनियली व मेक्सिकोचा मिग्वेल अँजेल रेयेस-व्हॅरेला यांच्यावर 5-7, 6-1, 7-6 (12-10) अशी मात केली. सुमारे अडीच तास ही लढत रंगली होती. रोहन बोपण्णा पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत खेळणार आहे.

Advertisement
Tags :

.