अल्कारेझ, ओसाका, केनिन, स्वायटेक दुसऱ्या फेरीत
अमेरिकन ओपन टेनिस : इव्हान्सचा विक्रमी विजय, सित्सिपस, शॅपोव्हॅलोव्ह, खचानोव्ह, ओस्टापेन्को, राडुकानू पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, जपानची नाओमी ओसाका, पोलंडजी इगा स्वायटेक, अमेरिकेची सोफिया केनिन यांनी येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली तर ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपस, ब्रिटनची एम्मा राडुकानू, एलेना ओस्टापेन्को, रशियाचा कॅरेन खचानोव्ह, कॅनडाचा डेनिस शॅपोव्हॅलोव्ह यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. ब्रिटनचा डॅनियल इव्हान्स व कॅरेन खचानोव्ह यांच्यातील सामना अमेरिकन ओपन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात दीर्घ काळ चाललेला सामना म्हणून नोंद झाली. अल्कारेझने ऑस्ट्रेलियाच्या लि तु याचा पावणेतीन तासाच्या खेळात 6-2, 4-6, 6-3, 6-1 असा पराभव करीत ग्रँडस्लॅममधील सलग 15 वा विजय मिळविला. ग्रँडस्लॅमचे ओपन युग सुरू झाल्यानंतर फ्रेंच ओपन, विम्बल्डन व यूएस ओपन स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा तिसरा टेनिसपटू होण्यासाठी अल्कारेझ प्रयत्नशील आहे. त्याने 2022 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्याची पुढील लढत बोटिक व्हान डी झांडशल्फशी होईली. बोटिकने कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हचे आव्हान, 6-4, 7-5, 6-4 असे संपुष्टात आणले.
ग्रीसच्या सित्सिपस या स्पर्धेतील पराभवाची मालिका यावेळीही खंडित करू शकला नाही. त्याला ऑस्ट्रेलियाच्या थानासी काकिनोकिसने 7-6 (7-5), 4-6, 6-3, 7-5 असे पराभूत करून दुसरी फेरी गाठली. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमविल्यानंतर सित्सिपसने दुसरा सेट जिंकून आशा निर्माण केल्या होत्या. पण नंतर त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने नंतरचे दोन सेट्स त्याने गमविले आणि काकिनोकिसने सुमारे चार तास चाललेली ही लढत जिंकली. या स्पर्धेत आजवर सित्सिपसला तिसरी फेरी पार करता आलेली नाही. कोकिनाकिसचा मात्र या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. त्याची पुढील लढत नुनो बोर्जेस किंवा फेडरिको कॉरिया यापैकी एकाशी होईल.
ओस्टापेन्को, राडुकानू स्पर्धेबाहेर
महिला एकेरीत अग्रमानांकित इगा स्वायटेकने दुसरी फेरी गाठताना रशियाच्या कॅमिला रखिमोव्हाचा 6-4, 7-6 (8-6) असा पराभव केला. स्वायटेकने 2022 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तिची दुसरी लढत जपानच्या इना शिबाहाराशी होईल. शिबाहाराने ऑस्ट्रेलियाच्या दारिया सेव्हिलेवर 6-3, 4-6, 7-6 (8-6) अशी मात केली. अन्य एका सामन्यात माजी चॅम्पियन एम्मा राडुकानूलाही पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला अमेरिकेच्या सोफिया केनिनने 6-1, 3-6, 6-4 असे हरवित दुसरी फेरी गाठली. केनिन ही 2020 मधील ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आहे. तिने आक्रमक खेळ करीत 6 बिनतोड सर्व्हिस नोंदवल्या. तिची लढत जेसिका पेगुला किंवा शेल्बी रॉजर्स यापैकी एकीशी होईल.
ओसाका दुसऱ्या फेरीत
जपानच्या नाओमी ओसाकाने एलेना ओस्टापेन्कोचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तिने ओस्टापेन्कोवर 6-3, 6-2 अशी सहज मात केली. कॅरोलिना मुचोव्हाविरुद्ध तिची दुसऱ्या फेरीत गाठ पडेल.
इव्हान्स-खचानोव्ह यांचा सर्वात ‘दीर्घ’ सामन्याचा विक्रम
अमेरिकन ओपनमधील एक ऐतिहासिक सामना मंगळवारी पहावयास मिळाला. ब्रिटनचा डॅनियल इव्हान्स व रशियाचा 23 वा मानांकित कॅरेन खचानोव्ह यांच्यातील पहिल्या फेरीचा हा सामना तब्बल 5 तास 35 मिनिटे रंगला होता. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील हा सर्वात दीर्घकाळ चाललेला सामना ठरला. जागतिक क्रमवारीत 28 व्या स्थानावर असणाऱ्या इव्हान्सने पाच सेट्सची ही विक्रमी लढत 6-7 (6-8), 7-6 (7-2), 7-6 (7-4), 4-6, 6-4 अशी जिंकली. निर्णायक सेटमध्ये तो 0-4 असा पिछाडीवर पडला होता. यातील प्रत्येक सेट तासाहून अधिक वेळ रंगला होता. सामन्यानंतर इव्हान्सने जल्लोष करीत आनंद साजरा केला. पण प्रेक्षकांनी दोघांच्याही जिगरबाज खेळाचे टाळ्या वाजवून कौतुक केले. यापूर्वी 1992 मधील उपांत्य लढतीत स्टीफन एडबर्गने अमेरिकेच्या मायकेल चँगवर पाच सेट्समध्ये विजय मिळविला होता. तो सामना 5 तास 26 मिनिटे चालला होता.