नेतान्याहू यांच्या पत्नीच्या विरोधात चौकशीचा आदेश
पंतप्रधानांसह परिवाराच्या अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या पत्नीच्या विरोधात चौकशीचा आदेश जारी झाला आहे. इस्रायलच्या अॅटर्नी जनरलनी नेतान्याहू यांच्या पत्नीच्या विरोधात आरोपांच्या चौकशीचा आदेश पोलिसांना दिला आहे. पंतप्रधानांच्या पत्नीने भ्रष्टाचाराच्या खटल्याप्रकरणी सुनावणीदरम्यान राजकीय विरोधक व साक्षीदारांचा छळ केल्याचा आरोप आहे.
भ्रष्टाचार प्रकरणी साक्ष देणारे लोक किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात निदर्शने आयोजित करविण्यात सारा नेतान्याहू यांची भूमिका होती, असा आरोप आहे. यासंबंधी काही व्हॉट्सअॅप मेसेजचा दाखला दिला जात आहे. या मेसेजपैकी एकामध्ये सारा यांनी सुनावणीतील मुख्य साक्षीदार हादास क्लेन यांची कोंडी करत त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात यावीत असे नमूद केले आहे.
इस्रायलच्या न्यायिक मंत्रालयाने सध्या सारा नेतान्याहू यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यासंबंधी कुठलीही औपचारिक टिप्पणी केलेली नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान बेंजामीन यांनी स्वत:च्या पत्नीचा बचाव केला आहे. माझी पत्नी अनेक प्रकारच्या धर्मादाय कामांशी जोडलेली आहे. तिने देश आणि समाजाच्या हितासाठी काम केले आहे. अशास्थितीत तिच्यावरून खोटे दावे केले जात असल्याचे बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
बेंजामीन नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे. नेतान्याहू यांच्यावर घोटाळा करणे आणि लाच घेतल्याचा आरोप आहे. याचबरोबर विश्वास तोडण्याचाही आरोप झाला आहे. तर माझ्या विरोधात काही वकील, पोलीस आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित लोक कट रचत आहेत. मी काहीच चुकीचे केलेले नाही, असा दावा बेंजामीन नेतान्याहू यांनी केला आहे.