विजापुरात कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या
पूर्ववैमनस्यातून धारधार शस्त्राने वार
वार्ताहर/विजापूर
विजापूर जिल्ह्याच्या सीमाभागातील अनेक गुह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात गुंड भागप्पा हरिजन (वय 50) याची गोळ्या झाडून व धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच जणांनी भागप्पावर हा हल्ला केला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले. घटनेविषयी अधिक माहिती अशी, नेहमीप्रमाणे भागप्पा हा जेवल्यानंतर मंगळवारी रात्री आकाशवाणी केंद्रासमोरील मदिनानगर येथे फिरावयास गेला होता. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर अचानक हल्ला करून प्रारंभी गोळ्dया झाडल्या. नंतर धारधार हत्याराने त्याच्या शरीरावर वार केले. त्यात भागप्पा जागीच गतप्राण झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह सहकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. या घटनेप्रकरणी अज्ञातांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
भागप्पाविरोधात दहाहून अधिक गंभीर गुन्हे
भागप्पा याच्यावर खून, दरोडा, खंडणी, गोळीबार, धमकी देणे यासह अन्य प्रकारातील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भागप्पा हरिजन हा मूळचा अलमेल तालुक्यातील ब्याडीहाळ गावचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध 10 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 19 जुलै 2020 रोजी त्याने भारतीय सोने व्यापाऱ्याला 2 किलो सोने अथवा 5 कोटी रुपये देण्याची मागणी करून धमकी दिल्याचा आरोप आहे. 2000 साली दक्षिण सोलापूर धोत्रे गावात पोलिसांनी कुख्यात रौडीशुटर चंदप्पा हरिजन याचा एन्काऊंटर केला होता. त्यावेळी भागप्पा याने पोलिसांवर गोळीबार केला होता. 1997 मध्ये चडचण पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या एका हत्येत त्याचा सहभाग होता. 1998 मध्ये आळंद पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या दोन खून आणि एका अपहरण प्रकरणातही त्याचे नाव आले होते. 1999 मध्ये अलमेल पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या एका हत्येत त्याचे नाव गोवले गेले होते. 2000 मध्ये पोलिसांवर गोळीबार, ब्याडीहाळ येथे खून, आळंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, 2001 मध्ये अलमेल पोलीस स्टेशन परिसरात साक्षीदारांवर गोळीबार आणि खून केल्याचा आरोपही आहे. तसेच 2003 मध्ये अफजलपूर तालुक्यातील शिरोळ येथे झालेल्या चार जणांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे.
मालमत्तेच्या वाटणीवरून वाद
एकेकाळी सहकारी असलेले भागप्पा व चंदप्पा यांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता केली होती. चंदप्पाच्या हत्येनंतर मालमत्तेच्या वाटपावरून चंदप्पाचा भाऊ बसवराज व भागप्पा हरिजन यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. करोडो रुपयांची मालमत्तेच्या वाटणीवरून ही घटना घडली असल्याची चर्चा करण्यात येत आहे.