कुख्यात गुंड जयेश पुजारी दहशतवाद्यांच्या गळाला?
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून हिंडलगा कारागृह प्रशासनाला माहिती, ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल, धर्मांध बनल्याचे स्पष्ट
बेळगाव : गेल्या दीड वर्षांपूर्वी न्यायालय आवारात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एक कैदी दहशतवादी कारवायात गुंतलेल्यांच्या गळाला लागला आहे. नवी दिल्ली येथील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट हिंडलगा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला कळविली असून त्या कैद्यावर गुरुवारी एफआयआर दाखल झाला आहे. जयेश पुजारी विरुद्ध गुरुवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयेश विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून कारागृहातून फोनवरून त्याने अनेकांशी संपर्क साधल्याचा संशय आहे. याची चौकशी करण्याची विनंती कारागृह अधिकाऱ्यांनी पोलीस दलाकडे केली आहे.
जयेश पुजारी हा अनेक नावांनी ओळखला जातो. जयेश ऊर्फ जयेशकांत ऊर्फ शाकीर या नावानेही तो ओळखला जातो. त्याला खून प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाने त्याची फाशी रद्द करून जन्मठेप कायम केली होती. सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात त्याला स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. जयेश पुजारी हा दहशतवादी गटाच्या गळाला लागल्याची माहिती मिळाली आहे. त्याला अधिक कट्टर बनविण्यात येत आहे. यासंबंधी एनआयएच्या नवी दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली आहे. कारागृहात राहून जयेश मोबाईल वापरतो आहे. मोबाईलवरून कारागृहाबाहेरील अनेकांच्या तो संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून कारागृह प्रशासनाने जयेशविरुद्ध फिर्याद दिली आहे. यासंबंधी कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
महाराष्ट्र एटीएसकडूनही चौकशी
दहशतवादी गटांच्या गळाला लागलेला जयेश नेहमी चर्चेत असतो. 14 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय मंत्री नितीश गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधून दाऊद इब्राहिम टोळीच्या नावे 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेशला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून धमकीसाठी वापरलेला फोन व सीमकार्ड जप्त केले होते. महाराष्ट्रातील एटीएसच्या अधिकाऱ्यांनीही जयेशची चौकशी केली होती. या घटनेनंतर 12 जून 2024 रोजी एका प्रकरणाच्या कामकाजासाठी जयेशला न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालय आवारात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला होता. त्याच दिवशी पोलिसांनी जयेशविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता. अशी वादग्रस्त पार्श्वभूमी असणारा जयेश आता दहशतवादी गटांच्या गळाला लागल्याचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांच्या तपासातून उघडकीस आले आहे.