सातारा नगरपालिकेच्या 60 फ्लेक्सवाल्यांना नोटिसा
सातारा :
विधानसभेचा निकाल लागताच शहरात चौकाचौकात फ्लेक्स लागले होते. त्यातले बहुतांशी फ्लेक्स हे विनापरवाना लागल्याची बाब पालिकेच्या अतिक्रमण हटावच्या निदर्शनास आली. त्यांनी सर्व्हे केल्यांनतर अशा 60 जणांनी विना परवाना कोणतीही परवानगी वा पालिकेचा कर न भरता फ्लेक्स लावल्याने त्यांना प्रत्येकी 60 हजार असा दंड एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. कित्येकदा प्रबोधन करुनही कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे कायदा आणि नियम हे मात्र पायदळी तुडवले जातात.
सातारा शहरात बॅनर, फ्लेक्स लावण्यासाठी सातारा पालिकेकडे परवानगी घ्यावी लागते. तसेच शहरात काही ठिकाणे ही बॅनर लावण्यास मनाई आहे. तरीही काही उत्साही कार्यकर्ते हे आर्वजून नेत्यांच्या नावाचे बॅनर, फ्लेक्स हे विनापरवाना लावतात. जर पालिकेची परवानगी घेतली तर त्या परवानगीची पावती त्या बॅनरवर लावत नाहीत आणि आम्ही परवानगी घेतली असे सगळीकडे सांगत सुटतात. अशाच काही कार्यकर्त्यांनी विधानसभा निकालानंतर शहरात बॅनर लावले होते. त्या सर्व बॅनरबाबतचा सर्व्हे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने केला. त्यामध्ये सुमारे 60 जणांचे बॅनर हे विनापरवाना आढळून आले. त्यांना रितसर दंडाची नोंटीस पालिकेच्यावतीने बजावली आहे.