सफाई कामगारांना अल्पोपाहार पुरविणाऱ्याला नोटीस
खराब अंडी पुरविल्याचे समोर : मनपा आयुक्तांकडून गंभीर दखल
बेळगाव : महापालिकेच्या सफाई कामगारांना सकाळच्यावेळी अल्पोपाहाराबरोबर देण्यात येणारी अंडी सुमार दर्जाची असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याबाबत सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून अल्पोपाहार पुरविणाऱ्या ठेकेदाराला मनपा आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांना देण्यात आला आहे. यात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्यायादीमध्ये समाविष्ट केले जाणार असल्याचे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
महापालिपेच्या सफाई कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून सकाळच्यावेळी अल्पोपाहार दिला जात आहे. अल्पोपाहाराबरोबरच अंड्यांचेदेखील वितरण केले जात आहे. इंदिरा कॅन्टीनला आहार पुरविणाऱ्या मयुर आदित्य मेटी या ठेकेदाराकडे सुरुवातीला अल्पोपाहार पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. महिनाभर अल्पोपाहार संबंधित ठेकेदाराकडून सफाई कामगारांना पुरविण्यात आला. मात्र सदर अल्पोपाहार न आवडल्याने दुसऱ्या ठेकेदाराकडून अल्पोपाहार घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यासाठी ठेकेदार निश्चितीसाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडून तीनवेळा निविदा काढण्यात आली.
मात्र सदर निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अल्पोपाहार पुरविण्याची जबाबदारी महांतेश मॅगीनमनी या ठेकेदारावर तात्पुरती सोपविण्यात आली आहे. त्यानुसार सफाई कामगार, ड्रायव्हर, क्लिनर, हेल्पर, लोडर्स, सुपरवायझर अशा एकूण 1400 जणांना दररोज अल्पोपाहार व अंड्यांचे वितरण केले जात आहे. अल्पोपाहारात चपाती, पावभाजी व अंडी दिली जातात. प्रत्येकी एका प्लेट्ससाठी सरकारकडून 35 रुपये दर दिला जात आहे. मात्र संबंधित ठेकेदार 34 रुपये 45 पैसेप्रमाणे अल्पोपाहार देत आहे. मंगळवारी अल्पोपाहाराबरोबर देण्यात आलेल्या अंड्यांचा दर्जा सुमार असल्याचे दिसून आल्याने सफाई कामगारांनी सदर अंडी न खाता फेकून दिली.
काही अंड्यांतील आतील भाग काळा पडला असून काही अंडी खराब झाली होती. याबाबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही माहिती समजताच सफाई कामगार हितरक्षण समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला, विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी व षण्मुख आदिंद्र यांनी मनपा आयुक्तांकडे सुमार दर्जाच्या अंड्यांची फोटो-व्हिडिओसह तक्रार केली आहे. या प्रकाराची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून अल्पोपाहार पुरविणारा ठेकेदार महांतेश मॅगीनमनी याला तातडीने नोटीस जारी केली. प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांना चौकशी करण्याची सूचना केली आहे. चौकशीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्यायादीत समाविष्ट केले जाणार आहे.
चौकशी करण्याची सूचना
महापालिकेच्या सफाई कामगारांना सकाळच्यावेळी अल्पोपाहार आणि अंड्यांचे वितरण केले जात आहे. सध्या महांतेश मॅगीनमनी या ठेकेदाराकडून अल्पोपाहार पुरविला जात आहे. मंगळवारी देण्यात आलेली अंडी खराब असल्याचे समोर आल्याने ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून याची चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे. ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्यायादीत समाविष्ट केले जाईल.
- शुभा बी., मनपा आयुक्त