मुडा प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला नोटीस; उच्च न्यायालयाचा आदेश
बेंगळूर : म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) कथित बेकायदा भूखंड वाटप प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी बी. एम. पार्वती, त्यांचे बंधू बी. एम. मल्लिकार्जुन स्वामी आणि म्हैसूरच्या विजयनगर पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मूळ तक्रारदार स्नेहमयी कृष्ण, सिद्धरामय्या आणि संबंधित जमिनीचे मूळ मालक जे. देवराजू यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि न्या. सी. एम. जोशी यांच्या पीठाने नोटीस जारी करून सुनावणी लांबणीवर टाकली. मुडा प्रकरणाचा सीबीआय तपास करावा, अशी विनंती स्नेहमयी कृष्ण यांनी केली आहे. सदर याचिकेत बी. एम. पार्वती यांना नोटीस जारी झालेली नाही. त्यामुळे पार्वती, मल्लिकार्जुन स्वामी, म्हैसूरच्या विजयनगर पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना नोटीस आणि हॅन्ड समन्स जारी करण्याचे निर्देश दिले.