आम्ही कोणतीच चूक केली नाही; नितीन गडकरींच्या नोटीसवर जयराम रमेश यांचा खुलासा
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटिसांवर प्रतिक्रिया देत आपण कोणतीही चूक केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच या नोटीसांना लवकरच उत्तर देऊ, असेही जयराम रमेश यांनी ठामपणे सांगितले आहे.
काही दिवसापुर्वी काँग्रेसच्या ट्विटर अकांउंटवर नितीन गडकरी यांच्या भाषणाचा एक भाग पोस्ट केला होता. या मध्ये नितीन गडकरी यांनी देशात परिस्थिती वाईट असूल्याचं म्हटल्याचं दाखवलं आहे. यावर नितीन गडकरी यांच्या वतीने त्यांचे वकिलांनी आक्षेप घेऊन चुकीची माहीती प्रसारित केल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे. काँग्रेसला धाडलेल्या नोटीसीमध्ये त्यांनी नितीन गडकरी हे देशातील महत्वाच्या पदावर असून ते भारतीय जनता पक्षाचे नेतेही आहेत. त्यांच्या भाषणातील काही भाग चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित करून काँग्रेस पक्षाने त्यांची आणि भारतीय जनता पक्षाची बदनामी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणी जर माफी नाही मागितली तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.
त्या नोटीसीवर भाष्य़ करताना काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रिय मंत्री जयराम रमेश यांनी आपण कोणत्याही प्रकारची चुक केली नसल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, “मी त्यांनी पाठवलेली कायदेशीर नोटीस वाचली आहे…आम्ही त्याला प्रतिसाद देऊ....आम्ही अशी कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही त्यांचे स्वतःचे शब्द वापरले आहेत पण ते का नाराज आहेत हे आम्हाला आद्याप समजले नाही.” असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.