गिरगावच्या राजाच्या महाराष्ट्रीयन फेट्याची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियात नोंद
२०० किलो वजनाचा फेटा बनविला पाच दिवसात
वेंगुर्ले (भरत सातोस्कर)-
मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या गिरगांव गणेशोत्सव मंडळाच्या राजाच्या महाराष्ट्रीयन फेट्याची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने नोंद घेतली असून या मंडळाने जगातील सर्वात उंच म्हणजे ६ फुट आणि २०० किलो वजनाचा फेटा पारंपरिक वस्त्रसामग्रीतून साकारला आहे . महाराष्ट्रीयन संस्कृती, परंपरा आणि गौरव यांचा संगम दाखवणारा हा फेटा मंडळाच्या गणेशमूर्तीच्या शोभेला अधिक आकर्षक बनवतो. ज्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडिया मध्ये अधिकृतरीत्या करण्यात आली. वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम केले आहे. म्हणूनच त्यांनी गिरगावच्या राजाच्या जगातील मोठ्या महाराष्ट्रीयन फेट्याची नोंद घेऊन मंडळाचे अभिनंदन केले आहे . यावर्षी गिरगावच्या गणेशोत्सव मंडळाने पारंपारिक महाराष्ट्रीयन फेट्याचा भव्य नमुना साकारत जगातील सर्वात उंब व जड फेटा बनवला आहे. या फेट्याची उंची तब्बल ६ फूट, तर व्यास १५ फूट असून, यासाठी व्हेलवेट फॅब्रिक, सेंटिन फॅब्रिक, गोल्डन झरी, कॉटन पेंडिंग आणि लोकर अशा पारंपरिक वस्त्र सामग्रीचा वापर करण्यात आला असून फेट्याचे एकूण वजन तब्बल २०० किलो (रचनेसह) आहे. बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी गिरगाव, मुंबई येथे या अद्वितीय निर्मितीचे अनावरण हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाले आणि गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी एक ऐतिहासिक सोहळा साक्षीदार ठरला.
ही अनोखी कलाकृती असून भक्तीभावाचे प्रतिक- सुषमा नार्वेकर
ही अनोखी कलाकृती केवळ आकारानेच नव्हे तर भक्तिभाव , परंपरा आणि कौशल्य यांचे प्रतीक ठरली आहे. गणेशोत्सव आणि महाराष्ट्रीय संस्कृती यांचा मध्य संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला, अशी प्रतिक्रिया वर्ल्ड रेकॉर्ड्सस बुक ऑफ इंडिया चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांनी दिली.गिरगांवचा राजा हे केवळ गणेशोत्सवाचे प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दर्पण आहे, हा फेटा म्हणजे आपल्या परंपरेला वाहिलेली मानवंदना आहे, आणि आम्हाला याचा अभिमान आहे असे आयोजकांनी सांगितले.