For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सातव्या टप्प्यातील लक्षवेधी मतदारसंघ

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
सातव्या टप्प्यातील लक्षवेधी मतदारसंघ
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा उद्या शनिवारी होत आहे. त्यानंतर या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची सांगत होणार आहे. सातव्या टप्प्यात एकंदर आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात अनेक लक्षवेधी मतदारसंघ आहेत. त्यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ सर्वात महत्वाचा आहे. मात्र, या सदरात हा मतदासंघ सोडून इतर काही चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांची माहिती आणि आढावा देण्यात आला आहे. वाराणसी मतदारसंघाची सविस्तर माहिती शनिवारी देण्यात येत आहे. इतर मतदारसंघ असे आहेत...

Advertisement

महाराजगंज (मतदारसंख्या साधारणत: 14 लाख 23 हजार)

  • या नावाचा आणखी एक मतदारसंघ बिहारमध्येही आहे. तथापि, उत्तर प्रदेशातील महाराजगंज या मतदारसंघाचे ऐतिहासिक महत्व आहे. 1952 पासून, अर्थात प्रथम लोकसभा निवडणुकीपासूनच अस्तित्वात असलेल्या या मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाचे पंकज चौधरी, समाजवादी पक्षाचे वीरेंद्र चौधरी आणि बहुजन समाज पक्षाचे मौसमे आलम अशी तिहेरी स्पर्धा होत आहे.
  • 1991 पासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गढ म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हापासून 2019 पर्यंतच्या आठ लोकसभा निवडणुकांपैकी 6 या पक्षाने जिंकल्या आहेत. तसेच सर्ववेळा पंकज चौधरी हेच या पक्षाचे उमेदवार राहिलेले आहेत. याहीवेळी भारतीय जनता पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाने वीरेंद्र चौधरी या तुलनेने नवख्या उमेदवाराला आणले आहे.

गोरखपूर (मतदारसंख्या साधारणत: 23 लाख)

Advertisement

  • भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘गीता मुद्रणालया’चे स्थान असणारा हा मतदारसंघ 1952 पासून अस्तित्वात आहे. या लोकसभा निवडणुकीत येथे भारतीय जनता पक्षाचे रवि किशन, समाजवादी पक्षाच्या काजल निषाद आणि बहुजन समाज पक्षाचे जावेद अश्रफ अशी तिरंगी स्पर्धा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या मतदारसंघातून 5 वेळा लोकसभेवर गेले आहेत.
  • 1989 पासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गढ म्हणून परिचित आहे. तेव्हापासून झालेल्या 11 लोकसभा निवडणुकांपैकी 10 निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. केवळ 2018 च्या मध्यावधी निवडणुकीत समाजवादी पक्ष विजयी झाला होता. 2019 मध्ये पुन्हा ही जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घेतली. रवि किशन शुक्ला यांनी ती निवडणूक जिंकली आहे.

बलिया (मतदारसंख्या साधारणत: 22 लाख)

  • एकेकाळी हा मतदारसंघ समाजवादी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखला जात असे. 1952 ची प्रथम लोकसभा निवडणूक भारतीय समाजवादी पक्षाचे राम नगीना सिंग यांनी जिंकली होती. नंतर काँग्रेसचा विजय काहीवेळा झाला. त्यानंतर समाजवादी पक्षाने ही जागा 3 वेळा जिंकली. भारतीय जनता पक्षाला ही जागा 2014 पर्यंत कधीही मिळाली नव्हती. तथापि, आता परिस्थिती वेगळी आहे.
  • यावेळी येथे भारतीय जनता पक्षाचे नीरज शेखर, समाजवादी पक्षाचे सनातन पांडेय आणि बहुजन समाज पक्षाचे लल्लन सिंग यादव यांच्या लढत आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाचे भरतसिंग यांनी निसटत्या बहुमताने ही जागा जिंकली होती. यावेळी या पक्षाने उमेदवार नवा दिला आहे. तथापि, भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची स्पर्धा येथे अपेक्षित आहे.

बालासोर (मतदारसंख्या साधारणत: 16 लाख 34 हजार)

  • या मतदारसंघाने आजवर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि बिजू जनता दल अशा ओडीशातील तीनही मुख्य पक्षांचे प्रतिनिधी लोकसभेत पाठविले आहेत. 2019 ची निवडणूक भारतीय जनता पक्षाचे प्रतापचंद्र सारंगी यांनी जिंकली होती. तर 2014 मध्ये बिजू जनता दलाचा विजय झाला होता. यावेळीही प्रतापचंद्र सारंगी आणि लेखाश्री सामंतसिंघर यांच्यातच प्रमुख स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
  • 1998, 1999 आणि 2004 या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची बिजू जनता दलाशी युती होती. युती तुटल्यानंतर प्रथमच 2019 मध्ये हा पक्ष विजयी झाला आहे. यंदा मोठी चुरस अपेक्षित आहे. सारंगी यांचा जनसंपर्क येथे मोठा आहे. त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. परिणामी, त्यांचा प्रभाव दिसून येतो.

केंद्रपाडा (मतदारसंख्या साधारणत: 22 लाख 24 हजार)

  • हा मतदारसंघ बिजू जनता दलाचा गढ मानला जातो. तथापि यंदा येथे चुरस असल्याचे मानले जाते. कारण भारतीय जनता पक्षाने बिजू जनता दलाचे 2014 चे खासदार बिजयंत पांडा यांना उमेदवारी दिली आहे. बिजू जनता दलाने अन्शुमन मोहंती यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसनेही सिद्धार्थ स्वरुप दास यांना उतरविले आहे. खरी लढत भारतीय जनता पक्ष आणि बिजद यांच्यातच आहे.
  • हा मतदारसंघ आतापर्यंत एकदाही भारतीय जनता पक्षाने जिंकलेला नाही. मात्र, यंदा प्रथमच या पक्षाने येथे आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे. बिजयंत पांडा यांचा जनसंपर्क आणि कार्य या मतदारसंघात आहे. तथापि, बिजू जनता दलानेही तगडा उमेदवार दिल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे उमेदवार जरी स्पर्धेत मागे दिसत असले तरी, त्यांनीही जोर लावला आहे. त्यामुळे स्पर्धा रंगतदार आहे.

सासाराम (मतदारसंख्या साधारणत: 22 लाख 48 हजार)

  • काँग्रेसचे प्रसिद्ध नेते जगजीवनराम यांचा हा मतदारसंघ होता. ते येथून 1952 पासून सलग सातवेळा विजयी झाले होते. नंतरच्या काळात हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे झुकल्याचे दिसून येते. या पक्षाचे मुन्नीलाल यांनी 1996, 1998 आणि 1999 असा सलग तीनदा विजय मिळविला आहे. 2004 आणि 2009 मध्ये जगजीवनराम यांच्या कन्या मीराकुमार विजयी झालेल्या होत्या.
  • 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. या पक्षाचे छेदी पासवान यांनी मोठ्या मताधिक्क्याने यश संपादन केले आहे. यावेळी या पक्षाने येथे शिवेश कुमार राम यांना उमेदवारी दिली आहे. पासवान यांनी निर्माण केलेल्या प्रचारयंत्रणेचा त्यांना लाभ होईल, असे मानले जाते. त्यांना काँग्रेसच्या मनोज कुमार यांची स्पर्धा आहे.

गुरुदासपूर (मतदारसंख्या साधारणत: 23 लाख)

  • एकेकाळी काँग्रेसचा गढ असलेला हा मतदारसंघ 1998 पासून भारतीय जनता पक्षाकडे वळला आहे. तेव्हापासून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सात पैकी पाच वेळा या पक्षाने विजय मिळविला आहे. या पक्षाचे नेते आणि चित्रपट अभिनेते विनोद खन्ना येथून तीनदा विजयी झाले आहेत. 2019 मध्ये धर्मेंद्र यांचे पुत्र आणि चित्रपट अभिनेते सनी देओल याच पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाले.
  • यावेळी भारतीय जनता पक्षाने येथे दीनेश सिंग हे नवे उमेदवार दिले आहेत. त्यांच्याशी काँग्रेसचे सुखजिंदरसिंग रंधावा आणि आम आदमी पक्षाचे अमनसेरसिंग स्पर्धा करीत आहेत. या मतदारसंघात हिंदू मतांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय जनता पक्षाने नवे उमेदवार दिल्याचे निवडणूक चुरशीची होईल, असे अनुमान आहे. आम आदमी पक्षाचे आव्हान भारतीय जनता पक्षाला परतावे लागणार आहे.

होशियारपूर-(मतदारसंख्या साधारणत: 18 लाख 62 हजार)

  • हा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या प्रभावाखाली एकेकाळी होता. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये  भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता. संत रविदास यांची तपोभूमी म्हणून हा भाग ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता याच मतदारसंघातून केली. येथे चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
  • यावेळी भारतीय जनता पक्षाने अनिता प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने यामिनी गोमर आणि आम आदमी पक्षाने डॉ. राजकुमार यांना उतरविले आहे. मुख्य स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात होईल, अशी शक्यता आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सोमप्रकाश विजयी झाले होते. यावेळी त्यांच्या पत्नी अनिता प्रकाश यांना या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Advertisement
Tags :

.