‘रेड’ नव्हे आता ‘ग्रोथ कॉरिडॉर’
नक्षलवादाचा सर्वनाश निश्चित : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील नक्षलवादाने ग्रस्त राहिलेले भाग आता विकासाची चव चाखत आहेत. या भागांमध्ये आता रस्ते, रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालये निर्माण झाली आहेत. ज्या क्षेत्रांना कधी नक्षलवादांचा गड मानले जायचे, ते आता शिक्षणाचे केंद्र ठरले आहेत. भारताच्या या भागांना कधीकाळी ‘रेड कॉरिडॉर’ म्हटले जायचे, परंतु आता ‘ग्रोथ कॉरिडॉर’चे रुप धारण करत आहेत. या परिवर्तनात आमचे पोलीस आणि सुरक्षा दलांची मोठी भूमिका राहिली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळेच नक्षलवादाची समस्या आता इतिहासजमा होणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी राष्ट्रीय पोलीस स्मारकात पोलीस स्मृती दिन कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले.
नक्षलवाद दीर्घकाळापासून आमच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान राहिले आहे, परंतु आम्ही ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ अणि सर्व निमलष्करी दल आणि स्थानिक प्रशासनाचा संयुक्त प्रयत्न प्रशंसनीय आहे. नक्षलवादाची समस्या पुढील वर्षापर्यंत पूर्णपणे समाप्त होईल असा विश्वास पूर्ण देशाला आहे. डाव्या उग्रवादाने प्रभावित जिल्ह्यांची संख्या अत्यंत कमी राहिली असून ही संख्या देखील मार्चपर्यंत शून्यावर येणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
पोलिसांचे योगदान
दीर्घकाळापर्यंत एक समाज आणि एका राष्ट्राच्या स्वरुपात आम्ही पोलिसांचे योगदान पूर्णपणे ओळखले नाही, ही खेदजनक बाब आहे. पोलिसांच्या शौर्याच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी आवश्यक सकारात्मक प्रयत्न पूर्वीच्या काळात झाले नाहीत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2018 मध्ये राष्ट्रीय पोलीस स्मारकाची स्थापना करण्यात आली. याचबरोबर पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्रs आणि उत्तम सुविधा देखील देण्यात आल्या. देशासमोर अनेक आव्हाने आहेत, परंतु आमची साधनसामग्री मर्यादित आहे. याचमुळे आम्हाला त्यांचा सर्वोत्तम वापर करावा लागेल. तसेच सर्व सुरक्षा यंत्रणांदरम्यान उत्तम समन्वय आणि एकजुटता असेल तरच हे शक्य असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
अंतर्गत अन् बर्हिगत सुरक्षेदरम्यान संतुलन
पोलिसांना सध्या गुन्ह्यांसोबत धारणेशीही (पर्सेप्शन) लढावे लागते. पोलीस स्वत:च्या अधिकृत कर्तव्यांसोबत नैतिक जबाबदारीही सांभाळत आहेत. जर काही चुकीचे घडले तर पोलीस आपल्यासोबत उभे राहतील, असा विश्वास देशाच्या नागरिकांना आहे. सैन्य आणि पोलिसांचे व्यासपीठ वेगळे असले तरीही राष्ट्रसुरक्षा हेच त्यांचे लक्ष्य आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी वाटचाल करत असताना अंतर्गत आणि बर्हिगत सुरक्षेदरम्यान संतुलन राखणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरले असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
36,684 पोलीस हुतात्मा
पंतप्रधानांनी 2019 मध्ये डीजीपी परिषदेदरम्यान केलेल्या सूचनेनुसार 22-30 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय पोलीस स्मारकात विविध केंद्रीय दलांच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्यांचे परिवारही सामील होतील. मागील एक वर्षात 191 पोलिसांनी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात एकूण 36,684 पोलिसांनी देशाची एकता, सार्वभौमत्व आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान केले असल्याचे वक्तव्य आयबीचे संचालक तपन डेका यांनी केले आहे.