करीमगंज नव्हे आता श्रीभूमि
आसाममधील जिल्ह्याचे बदलले नाव : मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
मुख्यमंत्री डॉ. हेमंत विश्व शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. या बैठकीत बराक खोऱ्यातील करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. या जिल्ह्याला आता श्रीभूमि या नावाने ओळखले जाणार आहे.
100 वर्षांपूर्वी रविंद्रनाथ टागोर यांनी आसाममध्ये आधुनिक करीमगंज जिल्ह्याला ‘श्रीभूमि’ मातालक्ष्मीची भूमी म्हणून वर्णिले होते. आसाम मंत्रिमंडळाने आता दीर्घकाळापासून केली जाणारी मागणी पूर्ण केली असल्याचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी ट्विट करत सांगितले आहे.
आसाम मंत्रिमंडळाने आसाम गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने याचबरोबर 30 डिसेंबरपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखांची घोषणा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले आहे.