एक इंच क्षेत्रही बळकावू देणार नाही!
फिलिपाईन्सच्या अध्यक्षांचा चीनला इशारा
वृत्तसंस्था/ होनोलूलू
दक्षिण चीन समुद्रातील स्थिती अधिकच तणावपूर्ण होत आहे. दक्षिण चीन समुद्रातील क्षेत्रावर अनेक देशांनी दावा केल्याने मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला इशारा दिला आहे. चीनने एटोल आणि शोल किनाऱ्यासाठी रुची दाखविली असली तरीही हे क्षेत्र फिलिपाईन्सच्या किनाऱ्यानजीक आहे. चीनच्या या कृतीमुळे स्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथील एका क्षेत्रीय शिखर परिषदेतून परतताना फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या सैन्याधिकारी आणि स्थानिक फिलिपिनो समुदायाची भेट घेतली आहे. अमेरिका आणि फिलिपाईन्स हे दोन्ही स्वत:च्या संरक्षण भागीदारीला मजबूत करत असताना त्यांचा हा दौरा पार पडला आहे.
चीन जवळपास पूर्ण दक्षिण चीन समुद्रावर स्वत:चा दावा करत आहे. तर फिलिपाईन्स आणि चार अन्य देश चीनचा हा दावा खोडून काढत आहेत. सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारांतर्गत चीनचा दावा अमान्य करण्यात आला आहे. तरीही चीनने याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
आम्ही झुकणार नाही
चीनसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान मार्कोस यांनी आमचा देश झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. फिलिपाईन्स आमच्या क्षेत्राचे एक इंच देखील कुठल्याही विदेशी शक्तीला देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर चीनने या क्षेत्रात अनेक बेटांचे सैन्यीकरण केले आहे. चीनने या बेटांना जहाजविरोधी आणि विमानविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा, लेझर आणि जॅमिंग उपकरणांनी युक्त केल्याचे अमेरिकेचे सांगणे आहे.
तणावात वाढ
चीनने सेकंड थॉमस शोलवर फिलिपाईन्सच्या एका सागरी चौकीला नष्ट केल्याने तणाव वाढला आहे. मागील महिन्यात चिनी तटरक्षक दलाच्या जहाजाने वादग्रस्त किनाऱ्यानजीक फिलिपाईन्सच्या जहाजाला टक्कर मारली होती. चीनने फिलिपाईन्सच्या सागरी वाहतुकीला रोखण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यामुळे फिलिपाईन्सला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे.