महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात वर्षा पर्यटनासाठी निर्बंध नव्हे, हवे ठोस धोरण !

06:42 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसाळी हंगामात वर्षा सहलीसाठी पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या धबधब्यांवर जाण्यास वनखात्याने निर्बंध घातल्याने सध्या हा वादाचा व चर्चेचा विषय बनला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या मुद्यांवरून जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर वनखात्याने कमी धोका आणि सुरक्षित असलेल्या सोळा धबधब्यावरील बंदी हटवली आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ही शिथीलता दाखवतानाच धोकादायक धबधब्यांवर बंदी हवीच अशी भूमिकाही घेतली आहे. त्यामुळे तूर्त या विषयाला पूर्णविराम मिळाला असला तरी दरवर्षी वर्षा पर्यटनाच्यादृष्टीने सरकारला एक ठोस धोरण आखल्याशिवाय या प्रश्नावर कायमचा तोडगा निघणार नाही.

Advertisement

Advertisement

पर्यटनाच्या नावाखाली चालणारी हुल्लडबाजी, बुडून मृत्यू होण्याच्या घटना आदी प्रकारांमुळे आता संरक्षीत वनक्षेत्रातील धबधबे तसेच गावातील काही छोट्या   जलप्रपातांवर वर्षा सहलींना निर्बंध घालण्याची मागणी वजा तक्रारी वाढत आहेत.   जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या गोव्याच्या अर्थव्यवस्थेतील मोठा वाटा खनिज उद्योग व त्यानंतर पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.

गेल्या एक तपापासून येथील खाण उद्योग बंद आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायच आता एका अर्थाने अर्थव्यवस्थेचा मूळ स्रोत उरला आहे. पावसाळ्यात येथील किनारी पर्यटन हंगाम बंद असतो. या ऑफ सिझनला निसर्ग व ग्रामीण पर्यटनामुळे सक्षम पर्याय सापडला आहे. फोंडा तालुक्यासह शेजारील धारबांदोडा, सत्तरी व सांगे तालुक्यातील स्पाईस फार्म व अॅडवेंचर पर्यटन पावसाळ्यात देशी व स्थानिक पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. त्यातच वर्षाऋतूमध्ये ग्रामीण भागातील वन्य परिसरात कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे गोव्याच्या अंतर्गत भागाकडे पर्यटकांची वाहने वळू लागली आहेत. यापैकी बहुतेक प्रमुख धबधबे हे संरक्षित वनक्षेत्रात असल्याने वनखात्याचे त्यावर नियंत्रण राहते. कुळे येथील जगप्रसिद्ध दूधसागर धबधबाही भगवान महावीर राष्ट्रीय अभयारण्यात येतो. मात्र त्याला सरकारने

ऑक्टोबर ते मे या मुख्य पर्यटन हंगामात अधिकृत परवानगी दिलेली आहे. तरीही पावसाळ्यात गोव्यासह शेजारील महाराष्ट्र व कर्नाटकातून हजारो पर्यटक रेल्वे मार्गाने किंवा रानातील आडवाटांनी या ठिकाणी पोहोचतात. पावसाळ्यात या स्थळावर साधनसुविधा व सुरक्षेचा अभाव असूनही  येथील आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक जीवाचे रान करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रावळी व सत्तरी तालुक्यातील काही धबधब्यांकडे स्थानिक पर्यटकाबरोबरच देशी पर्यटकांचाही ओढा वाढला आहे. मात्र दरवर्षी पर्यटकांच्या बुडून मृत्यू होण्याच्या दुर्घटना व त्यातून निर्माण झालेला सुरक्षेचा प्रश्न यामुळे वनखात्याने प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या धबधब्यांबरोबरच खेडे गावातील छोट्या मोठ्या निर्झरांकडे वर्षा सहलींसाठी गर्दी लोटत आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी उसळणारी गर्दी व त्यातून घडणाऱ्या गैरप्रकारांना स्थानिकांचा आक्षेप आहे. सहलींच्या नावाखाली  पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत चालणारी हुल्लडबाजी, दंगामस्ती तसेच जीवावर उदार होऊन साहसाच्या नावाखाली फाजीलपणातून जीव धोक्यात घालण्याचे वाढते प्रकार पर्यटनाच्या मूळ उद्देशाला धक्का लावतात. या पर्यटनामध्ये निसर्गाचा निखळ आनंद घेण्यापेक्षा ओरबाडलेपणाच अधिक दिसतो. त्यामुळेच ही निसर्गस्थळे वादाचे कारण ठरत आहेत. दारुच्या बाटल्यांचा पडणारा खच, अस्ताव्यस्त फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे या सौंदर्यस्थळांचे चाललेले विद्रुपीकरण हेही त्याला कारणीभूत आहे. त्यातूनच स्थानिक व पर्यटक यांच्यात संघर्ष निर्माण होण्याच्या घटना हल्ली गावोगावी वाढताना दिसतात. आंबोलीच्या घाटात तसेच दूधसागर धबधब्यावर बेभान होऊन मोबाईलवर सेल्फी घेण्याच्या नादात काही पर्यटकांनी आपले अनमोल जीव गमावल्याच्या घटना या पर्यटनावर विपरित परिणाम करीत आहेत.

पर्यटनाच्या नावाखाली फोफावणाऱ्या या अपप्रवृत्तीमुळे निखळ पर्यटनाचा आस्वाद घेऊ पाहणारा निसर्गप्रेमी पर्यटक या निर्बंधाचा बळी ठरत आहे. मुळात माणसाचा निसर्गाकडे असलेला ओढा हा तेवढाच नैसर्गिक आहे. माणसाला जीवनाचा छंद मुळी जडला तो या निसर्गाच्या कुशीत. मानव जातीची उत्पत्ती होऊन त्याची जडण घडण निसर्गाच्या सान्निध्यातच झाली. नागरीकरण हा नंतरचा भाग. ज्या सृष्टी सौंदर्यासाठी गोमंतक प्रदेश जगभर ओळखला जातो, त्या गोव्याच्या भूमित बा. भ. बोरकरांसारख्या कवींना निसर्गाच्या सहवासात दिव्यत्त्वाची प्रचिती आली. अनेक चित्रकारांच्या कुंचल्याना प्रतिभेचे अंकुर येथेच फुटले. याच उर्मीने वर्षाऋतुमध्ये अनेक प्राणीमित्र, पक्षी निरीक्षक ग्रामीण भागातील या निसर्ग स्थळांकडे जातात.

बहरून येणारे निसर्गाचे रुप, तेथील पशुपक्ष्यांचे जीवन आपल्या कॅमेऱ्यातून टिपण्यासाठी दिवस घालवतात. निसर्गाशी एकऊप होण्याच्या या आंतरिक ओढीला  निर्बंध कसे घालता येतील? आचार्य अत्रे यांनी आपले जीवनानुभव सांगताना, जे रम्य आणि भव्य आहे त्याचे दर्शन खेडेगावातच घडते असे लिहून ठेवले आहे. पावलोपावली परमेश्वर तुमच्याशी येथे बोलत असतो. त्याची कृपा नदीच्या रुपाने वाहत असते. शिवारामधल्या शेतात डोलणाऱ्या पिकावरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्वासच प्रत्येक क्षणी घेऊन येतो. आपण शहरात सोयीसाठी राहत असलो तरी निसर्गाची ही संगत सुटत नाही. निसर्गाचा ओढा हा असाच असतो. जो कुणालाही कितीही आवरायचा झाल्यास अनावर होतो.

सरकारने धबधब्यांवर निर्बंध घालून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा ग्रामीण पर्यटनाला पुरक अशी निसर्ग पर्यटनस्थळे म्हणून तेथे साधनसुविधा पुरवाव्यात. सुरक्षेच्या उपाययोजना आखाव्यात. गावामधील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्यातून रोजगार मिळेल. सरकारने योग्य नियोजन केल्यास महसूल प्राप्तीचे स्रोतही तयार होतील. त्यासाठी समन्वय, सहयोग व नियोजन आवश्यक असल्याचे निसर्गप्रेमी पर्यटकांचे मत आहे. वर्षा पर्यटनाला चालना देणारे ठोस धोरण आखल्यास सध्याचे प्रश्न त्यातून सुटतील. निव्वळ निर्बंध लादून मानवीकांक्षाना मुरड घालता येणार नाही...!

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article