घर नाही, तर चक्रव्यूहच...
सध्या सोशल मिडीयावर एका अनोख्या घराची बरीच चर्चा होत आहे. हे घर टिकटॉक स्टार डू डार्कसन याचे असल्याची माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे. या व्हिडोओतून दर्शकांना या घराची सहल घडवून आणली गेली आहे. हे घर इतके विचित्र आहे, की एकदा आत गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी तुम्हाला घराच्या मालकाचेच साहाय्य घ्यावे लागते. हे घर म्हणजे सत्यता आणि आभास यांचे एक असे मिश्रण आहे, की ज्याची कल्पना करता येणेही अशक्य आहे.
या घराचा दरवाजा आपण उघडलात तर समोर भिंत उभी असल्याचे दिसून येते. तसेच या घराच्या खोलीत पाय ठेवण्याचा प्रयत्न केलात, तर पाय ख•dयात पडला असल्याचे जाणवते. एवढे होऊनही आपण घरात आणखी आत गेलात, तर आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. महाभारतातील ‘मयसभे’त गेल्यासारखी आपली स्थिती होते. त्यामुळे हे घर अत्यंत सुरक्षित आहे. कारण, या घरात कोणी चोर किंवा दरोडेखोर शिरलाच, तर त्याला तेथेच अडकून पडावे लागते. तो या घराच्या मालकाच्या मार्गदर्शनाशिवाय घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशी त्याची स्थिती होते. हे घर म्हणजे, वास्तूशास्त्राचा एक अद्भूत प्रकार असल्याचे अनेकांचे मत आहे. या घरातील प्रत्येक भाग, प्रत्येक कानाकोपरा आश्चर्यकारक आहे. जे आहे, असे वाटते, ते नसते, अशी स्थिती या घरात जाणाऱ्याची होते, असा अनुभव अनेकांनी कथन केला आहे. हे घर नसून एक अजब भुलभुलैय्या आहे, असे मत अनेक दर्शकांनी व्यक्त केले. अशा घराची निर्मिती केली गेलीच कशी, असा प्रश्नही अनेकांना पडतो. या घरातील शयनकक्ष किंवा बेडरुम्स तर आचंबित करणाऱ्या आहेत. हॉलमधील पेंटींगला धक्का दिला, तर संपूर्ण बेडरुम दिसू लागते. आत कपाट, अलमारी, पलंग हे सारे काही दिसते. पण आत जायचे कसे हे समजत नाही. तसेच या स्थानी बेडरुम आहे, हे बाहेरुन कळतही नाही. अशीची स्थिती स्वयंपाकघर किंवा अन्य कोणत्याही खोलीत जाण्याचा प्रयत्न केल्यास होऊ शकते. मुख्य अडचण अशी होते, की एकदा आत गेल्यानंतर बाहेर पडण्याचे सर्व मार्ग अदृष्यच झाल्यासारखे भासतात. या घराच्या रचनेची पूर्ण माहिती असेल, तरच त्यात कोणी व्यक्ती वावरु शकेल, अशा विचित्र प्रकारे या घराची रचना केली असल्याचे दिसून येते. याला लक्षावधी दर्शक लाभले आहेत. असंख्य दर्शकांनी या कल्पकतेचे तोंड भरुन कौतुक केलेले आहे.