35 नव्हे; 33 टक्के गुण मिळाले तरी उत्तीर्ण!
दहावी, बारावी विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार : सरकारकडून मसुदा अधिसूचना जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात दहावी आणि बारावी परीक्षेत सर्व विषयांत मिळून एकूण 33 टक्के गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण ठरविले जाणार आहे. सरकारने परीक्षा पद्धतीत बदल केला असून यासंबंधीची मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य शिक्षण खात्याने दहावी आणि बारावी उत्तीर्णसाठी असणारे किमान गुणांची टक्केवारी 35 ऐवजी 33 करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांवरील ताण काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, असे मत शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने प्रथम नियम (दुरुस्ती)-2025 आणि कर्नाटक पदवीपूर्व परीक्षा (मूल्यमापन प्रणाली) नियम-2025 मसुदा अधिसूचना जारी केल्या आहेत.
राज्य सरकारने 1983 च्या कर्नाटक शिक्षण कायद्यामधील अधिकाराचा वापर करून मसुदा अधिसूचना जारी केली आहे. त्यावर 15 दिवसांत आक्षेप किंवा सल्ले सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. सरकारने सीबीएससीच्या धर्तीवर राज्य शिक्षण विभागात बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने उत्तीर्णसाठी असणारी किमान टक्केवारीत आणखी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35 गुण मिळविणे बंधनकारक होते. मात्र, नव्या मार्गसूचीनुसार विद्यार्थ्याने लेखी परीक्षा आणि प्रायोगिक परीक्षेसह अंतर्गत मूल्यमापनात 100 पैकी 33 गुण मिळविले तरी पुरेसे आहे. याचा अर्थ असा का, एकूण 625 पैकी 206 गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण होईल.
प्रायोगिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन नसणाऱ्या विषयांत 80 गुणांपैकी लेखी परीक्षेत किमान 24 गुण मिळावयास हवे. प्रायोगिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन होणाऱ्या विषयांत 70 पैकी किमान 21 गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र, हे किमान गुण असामान्य प्रसंगी राज्य सरकारकडून निश्चित केल्या जाणाऱ्या शर्तींच्या अधीन राहून शिथिल केल्या जाऊ शकतात किंवा त्यात बदल केला जाऊ शकतो.
सराव परीक्षा 30 गुणांऐवजी 20 गुणांची घेण्याबाबत मसुदा अधिसूचनेत उल्लेख करण्यात आला आहे. तांत्रिक आणि प्रागोयिक वर्गांसह प्रत्येक विषयात किमान 75 टक्के हजेरी, निश्चित केलेल्या किमान प्रमाणात प्रयोग करून प्राध्यापकांकडून प्रमाणिकृत करून सादर केल्यास तसेच प्रायोगिक परीक्षेला हजर झाल्यास उर्वरित 10 गुण देता येतील, असाही उल्लेख करण्यात आला आहे.