नोस्कोव्हा, किनवेन, अल्कारेझ उपांत्यपूर्व
रशियाची कॅलिनस्काया, बोपण्णा-एब्डन यांचीही आगेकूच
वृत्तसंस्था/ मेलबर्न
झेकची किशोरवयीन टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हा पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एलिना स्विटोलिनाकडून पुढे चाल मिळाली. याशिवाय झेंग किनवेन, अॅना कॅलिन्स्काया, कार्लोस अल्कारेझ व 17 वर्षीय टॉमेक बेर्कीटा यांनीही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डन यांनीही उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.
झेक प्रजासत्ताकची 19 वर्षीय नोस्कोव्हा व युक्रेनची स्विटोलिना यांच्यात लढत सुरू असताने तिने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण स्विटोलिनाने दुखापतीमुळे माघार घेतल्याने तिला पुढे चाल मिळाली. स्विटोलिनाने आधी 2-0 वर असताना मेडिकल टाईमआऊट घेतले. पण वेदना सहन न झाल्याने तिने सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला. नोस्कोव्हाने तिसऱ्या फेरीत इगा स्वायटेकचे आव्हान संपुष्टात आणले होते.
बिगरमानांकित रशियाच्या 23 वर्षीय अॅना कॅलिनस्कायाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठताना 26 व्या मानांकित इटलीच्या जस्मिन पावोलिनीवर 6-4, 6-2 अशी मात केली. यापूर्वी चार वेळा या स्पर्धेत तिला लवकर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. तिची पुढील लढत चीनच्या 12 व्या मानांकित झेंग किनवेनशी होईल. किनवेनने फ्रान्सच्या ओशीन डोडिनचा 6-0, 6-3 असा फडशा पाडत आगेकूच केली. किनवेनने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती आणि डब्ल्यूटीए टूरवरील मोस्ट इम्प्रुव्ह्ड खेळाडूचा पुरस्कारही मिळविला होता.
पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने सर्बियाच्या मिओमिर केसमानोविचचा 6-4, 6-4, 6-0 असा सहज पराभव केला. त्याची उपांत्यपूर्व लढत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हशी होईल. या स्पर्धेत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविण्याची अल्कारेझची ही पहिलीच वेळ आहे.
टॉमस बेर्कीटाची सर्वात वेगवान सर्व्हिस
ज्युनियर विभागातील एकेरीत पोलंडच्या 17 वर्षीय टॉमेक बेर्कीटाने आपल्या ताकदीची झलक दाखवताना या स्पर्धेतील सर्वात वेगवान सर्व्हिसची नोंद केली. त्याला येथे तिसरे मानांकन मिळाले असून त्याने 233 किमी (145 मैल प्रतितास) वेगवान सर्व्हिस नोंदवली. ब्राझीलच्या एन्झो कोहलमन डी फ्रीटासवर त्याने 7-6 (7-1), 3-6, 6-2 अशी मात केली. वरिष्ठ पुरुष विभागात यावर्षी अमेरिकेच्या बेन शेल्टनने 231 किमी प्रतितास वेगवान सर्व्हिस नोंदवली आहे. तिसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला.
रोहन बोपण्णा-मॅथ्यू एब्डनची उपांत्यपूर्व फेरीत धडक
रोहन बोपण्णा व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डन यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारताना 14 व्या मानांकित वेस्ली कूलहॉफ व निकोला मेक्टिक यांच्यावर 7-6, 7-6 अशी मात केली. बोपण्णा-एब्डन यांना येथे दुसरे मानांकन मिळाले असून त्यांची पुढील लढत सहाव्या मानांकित सहाव्या मानांकित अर्जेन्टिनाच्या मॅक्झिमो गोन्झालेझ व आंद्रेस मोल्टेनी यांच्याशी होणार आहे.