For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर कोरियाची प्रक्षोभक क्षेपणास्त्र चाचणी

06:27 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
उत्तर कोरियाची प्रक्षोभक क्षेपणास्त्र चाचणी
Advertisement

दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्यातील वैर जगजाहीर आहे. एकीकडे हमास-इस्त्रायलमुळे मध्यपूर्वेत तणाव आहे तर दुसरीकडे युक्रेन-रशिया युद्ध जारी असल्याने पश्चिमेकडे संघर्षाचे चित्र आहे. असे असताना पूर्वेकडे उत्तर कोरियाने या आठवड्याच्या आरंभी दूर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेत खळबळ माजवली आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे हजारभर किलोमीटर्स प्रवास करून कोरियन द्विपकल्पात पडले. तत्पूर्वी त्याने सहा हजार किलोमीटर उंची गाठली होती, असे वृत्त आहे. जपानचे उपसंरक्षण मंत्री शिंजो मियाके यांनी सदर क्षेपणास्त्राचा पल्ला पंधरा हजार कि.मी. इतका असून तसा तो असेल तर अमेरिकेची सारी सीमा त्याच्या टप्प्यात येण्याची शक्यता वर्तविली आहे. सद्यस्थितीत हे क्षेपणास्त्र कोसळल्याने होक्राईडो जपानी बेटावरील नागरिकांना हा सावधगिरीचा इशारा मानला गेला आहे. जपान सरकारने या संदर्भात सुरक्षा समितीची बैठक बोलावून संभाव्य परिणामांवर चर्चा केली आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी क्षेपणास्त्र परिक्षणाचा निषेध नोंदवताना अशा प्रकारे क्षेपणास्त्र चाचणी करणे हे उघडपणे युनो सुरक्षा समितीच्या नियमावलीचा भंग करणारे कृत्य असून प्रादेशिक स्थैर्य व शांततेसही त्यामुळे धोका पोहचत असल्याचे निदर्शनास आणले आहे.

Advertisement

उत्तर कोरियाचा खरा शत्रू दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने या क्षेपणास्त्र चाचणीचा तीव्र शब्दात निषेध करताना क्षेपणास्त्र तंत्रज्ञान गतिमान करण्याचा व अवकाशातून पाळत ठेवण्याची यंत्रणा बळकट करण्याचे उत्तर कोरियाचे प्रयत्न हे शेजारी देशांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन हे आपल्या युद्धखोर व भडकाऊ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मागील काळात त्यांनी अमेरिकेसही धमक्या देण्यास अनमान केलेले नाही. उत्तर कोरियावर जागतिक निर्बंध असतानही तेथील राजवटीने आपला अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे बनविण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. आजमितीस उत्तर कोरियाच्या शस्त्र संपदेत झालेली वाढ, दक्षिण कोरिया, जपान व अमेरिकेस धडकी भरवणारी आहे. खरे तर दक्षिण कोरियाने आपला अण्वस्त्रे बनवण्याचा कार्यक्रम 50 वर्षापूर्वी जागतिक अण्वस्त्र बंदी करारास अनुसरून थांबविला होता. दोन्ही कोरियांमधील संघर्षाचा दीर्घकालीन इतिहास पाहता या दोहोतील शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे सारा पूर्वेकडील प्रदेशच धोक्यात येईल, असे वाटून अमेरिका, दक्षिण कोरियाने अण्वस्त्र बंदी करार पाळावा म्हणून आग्रही होती. परंतु दुसऱ्या बाजूने उत्तर कोरियाने अत्याधुनिक अण्वस्त्रे बनविण्याचा उपक्रम सुरूच ठेवल्याने आणि त्यातही अमेरिकेसही टप्प्यात घेऊ शकतील, अशी क्षेपणास्त्रे तयार केल्याने असा हल्ला दक्षिण कोरियावर किंवा अमेरिकेवर झालाच तर त्याला उत्तर देण्यासाठीची तयारी दोन्ही देशांनी सुरू केली. गेल्या एप्रिल महिन्यात अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान उत्तर कोरियाकडून जर हल्ला झालाच तर त्याला जलद, प्रभावी व निर्णायक प्रत्युत्तर देण्यासंबंधीचे करार झाले. याचाच एक भाग म्हणून अण्वस्त्र सज्ज अमेरिकन पाणबुड्या दक्षिण कोरियन बंदरास नियमित भेट देण्यासाठी तैनात करण्यात आल्या.

त्यानंतर अगदी अलीकडेच अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे वरिष्ठ अधिकारी वॉशिंग्टनमध्ये भेटले. त्यांनी आकस्मिक अण्वस्त्र हल्ल्यास प्रतिबंध करण्याच्या रणनीतीत नव्याने काय करता येईल याविषयावर चर्चा केली. सदर बैठकीत दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी कवायतीत अण्वस्त्र हल्ल्याप्रसंगी आपली बाजू लढविण्याचे तंत्रही अंर्तभूत करण्याचे निश्चित झाले. सध्याच्या काळात अमेरिका व द. कोरियाने संयुक्त लष्करी कवायतीची विमानवाहू जहाजे, आण्विक क्षमता असलेली अस्त्रs, अत्याधुनिक स्फोटके यांच्या द. कोरियास होणाऱ्या पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे. या हालचालींना विरोध करण्यासाठी उत्तर कोरिया, रशिया आणि चीनच्या अधिक जवळ सरकला आहे. यामुळे जागतिक पातळीवरील दोन ध्रुवीय राजकीय समीकरणे पूर्व भागात विघातक पद्धतीने गतिमान होताना दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांनी रशियन अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली होती. या भेटीपूर्वी अमेरिकन शस्त्र पुरवठा करण्यासाठी करार करणार असल्याचा इशारा दिला होता. त्या बदल्यात उत्तर कोरियास महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, नवी शस्त्रे विकसित करण्यासाठी मिळणार असल्याचे त्यांनी सुचीत केले होते. खरे तर हा दक्षिण कोरिया-अमेरिका युतीस सावधगिरीचा इशारा होता. ज्याचे प्रत्यंतर ताज्या क्षेपणास्त्र चाचणीतून दिसून आले आहे.

Advertisement

तसे पाहता अमेरिका-दक्षिण कोरिया व रशिया चीन-उत्तर कोरिया अशा युतीचा आणि त्यातील संघर्षाचा इतिहास 70 वर्षापूर्वीचा आहे. 1948 सालापर्यंत कोरिया हा एकसंध देश होता. त्याचे विभाजन झाले नव्हते. 1919 सालापासून संपूर्ण कोरिया जपानने ताब्यात घेतला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी पाठोपाठ जपानही पराभूत झाला. अशावेळी जर्मनीत जे घडले त्याची पुनरावृत्ती कोरियात झाली. तत्कालिन सोव्हिएत रशियाने कोरियाचा उत्तर भाग ताब्यात घेतला तर दक्षिण भाग अमेरिकेच्या कब्जात गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशिया व अमेरिका यांच्यात विचारधारेच्या आधारे शीतयुद्ध झाले. अमेरिका व इतर काही देश दक्षिण कोरियाच्या बाजूने तर रशिया व चीन उत्तर कोरियाच्या बाजूने युद्धात उतरले. हे युद्ध तीन वर्षांनी संपले. 1953 साली उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन देश स्वतंत्रपणे निर्माण झाले. आजही दोहोंचे जुने साथीदार आधी होते तेच आहेत. दोन्ही देशातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आजही आहे. केवळ जपान हा देश दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या मार्गदर्शनात दक्षिण कोरियाच्या बाजूने उभा आहे.

आज हे दोन्ही कोरियन देश परस्परांवर आरोप करीत शस्त्रास्त्र क्षमता वाढवित आहेत. अण्वस्त्र बंदी करार आजच्या जगात उ. कोरिया व इराण आणि इतर अनेक देश पाळताना दिसत नाहीत. उ. कोरिया, इराण, रशिया या देशांवर निर्बंध येऊनही अण्वस्त्रे निर्माण होतच आहेत. मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग यांच्याशी बोलणी करून त्यांना शांतवण्याचा प्रयत्न केला. परंतु परवाच्या नव्या क्षेपणास्त्र चाचणीने त्याची विफलता स्पष्ट केली आहे. त्यातही किम जोंग हे उ. कोरियाचे हुकूमशहा ‘माथेफिरु’ म्हणून ओळखले जातात. म्हणूनच ताज्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे पूर्वेकडे आणि जगात इतरत्र खळबळ माजली आहे. आज स्थिती ही आहे की अमेरिका व चीन यांच्यात कडवी स्पर्धा आहे. इतर अन्य देश त्यांच्या पाताळयंत्री बुद्धिबळातील केवळ सोंगट्या आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या आक्रमक चालीमुळे सारे जगच संकटात येऊ शकते.

- अनिल आजगावकर

Advertisement
Tags :

.