For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुन्हा ठाकरे-फडणवीस वाद

06:40 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
पुन्हा ठाकरे फडणवीस वाद
Advertisement

प्रकल्पाला स्थगिती द्यायला मी काय उध्दव ठाकरे नाही, असे विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि पुन्हा एकदा ठाकरे-फडणवीस यांच्यात वाद सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे यांनी थेट फडणवीसांना ‘एक तर तू तरी राहशील किंवा मी राहीन’ असा निर्वाणीचा इशारा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत अभिनंदन केल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील कटुता कमी होत असल्याचे वाटत असताना, आता पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील द्वंद्व सुरू झाले आहे.

Advertisement

एकीकडे राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे, या अधिवेशनात सभागृहाबाहेर झालेल्या वक्तव्यांवर पहिला आठवडा गाजला. मग ते निलंबित आमदार अबु आझमी असो, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर असो किंवा भैय्याजी जोशी असो, यांच्या वक्तव्याचे अधिवेशनात चांगलेच पडसाद उमटले. मात्र दुसऱ्या आठवड्याची सुरूवात ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठाकरेंच्या बाबत केलेल्या वक्तव्याने आता पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीस या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना प्रकल्प बंद पाडायला मी उद्धव ठाकरे नाही, असा टोला फडणवीसांनी मारला. त्याला ठाकरे यांनी फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात कऊन दाखवावी असे आव्हान दिले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीसोबत फारकत घेण्याबाबत केलेले वक्तव्य, फडणवीस यांनी 1 जानेवारीला केलेल्या गडचिरोली दौऱ्यावऊन शिवसेनेच्या मुखपत्रात तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांकडून झालेले कौतुक लक्षात घेता, कुठेतरी पॅचअप होत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे एकीकडे शिंदे गट तर दुसरीकडे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. आज ही भाजप नेत्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये ज्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही, त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने सत्तेचा वाटा त्यांना द्यावा लागल्याने आमची संधी हुकल्याची भावना आहे आणि यासाठी उध्दव ठाकरे जबाबदार असल्याचे ते बोलतात. गेल्याच आठवड्यात मुंबईत भैय्याजी जोशी यांनी मुंबईत केलेल्या मराठी भाषेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे, अशी ठामपणे ग्वाही दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी उठलेल्या आदित्य ठाकरे यांना भाजपच्या आमदारांनी बोलू देखील दिले नाही. भाजपच्या आमदारांनी आक्रमक होत आता आभार कसले मानता, बाळासाहेबांचा जनाब उल्लेख होत होता, तेव्हा शांत का राहिलात असा प्रश्नच भाजपच्या आमदारांनी आदित्य ठाकरे यांना विचारला. त्यामुळे भाजपचे मुंबईतील आमदार शिवसेना ठाकरे गटाविरोधात विधानसभेत जास्तच आक्रमक होताना दिसले.

उध्दव ठाकरे यांनी रविवारी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना पुन्हा एकदा भाजपच्या हिंदुत्वावर संशय व्यक्त केला आहे. ‘कोणी ‘जय श्री राम’ म्हणत असेल तर त्याला ‘जय भवानी-जय शिवाजी’ म्हणत उत्तर द्या’. भाजपने आमच्या समाजात विष कालवले आहे. भाजप नेत्यांनी कधीकाळी पाकिस्तानसोबतच्या सामन्यांना विरोध केला होता आणि आज तेच भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश असे क्रिकेट सामने खेळवताहेत. अशा वेगवेगळ्या मुद्द्dयांमधून ठाकरेंनी भाजप सरकारवर हल्ला केला. ‘बटेंगे नही, कटेंगे नही, फुटेंगे नही’ असे बोलत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. मुंबई महापालिका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. भाजपची राज्यात जरी सत्ता आली असली तरी, मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे 36 पैकी 10 आमदार निवडून आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेची आजही मुंबईवरील पकड ही कार्यकर्ता, गटप्रमुख आणि शिवसैनिकांच्या माद्यमातून कायम असल्याचे मुंबई शिक्षक, पदवीधर तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांच्या माध्यमांतून दिसले. आज जरी भाजपकडून मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे सांगितले असले तरी, भाजपने ऐनवेळी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास सगळ्यात मोठा फटका हा शिंदे गटाला बसणार आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र आपण मुंबई आणि काही माहपालिकांच्या निवडणुका या स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा कऊन टाकली आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच इतर महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल.

Advertisement

भाजप आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर धुसफुस

भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यामंध्ये पालिका निवडणूकीपूर्वीच धुसफुस सुरू झाली आहे. महायुतीतील वरिष्ठ पातळीवरील नेते जरी महायुती म्हणून आगामी महापालिका निवडणूका एकत्र लढणार असल्याचे बोलत असले तरी, स्थानिक पातळीवर मात्र कोणताच कार्यक्रम महायुती म्हणून एकत्र होताना दिसत नाही. मुंबईत भाजपचे आमदार जास्त आहेत, आमदारांना आपल्या मतदार संघात भाजपचाच नगरसेवक हवा आहे. भाजपचा राज्यात मुख्यमंत्री त्यातच गृहखाते देखील भाजपकडे असल्याने स्थानिक पातळीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची कोंडी होऊ लागली आहे. नुकताच मुंबईतील शिंदे गटाच्या एका विभागप्रमुखावर मराठी माणसाचे दुकान हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, हे प्रकरण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच उजेडात आले होते. इतके दिवस या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती, आता सत्ताबदल आणि गृहमंत्री बदलताच याचे परिणाम स्थानिक पातळीवर दिसू लागले.

Advertisement
Tags :

.