उत्तर कोरियाकडून अंडरवॉटर आण्विक ड्रोनचे परीक्षण
अनेक तास पाण्यात राहण्याची क्षमता
वृत्तसंस्था / प्योंगयांग
उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अंडरवॉटर आण्विक ड्रोनचे परीक्षण केले आहे. तेथील शासकीय वृत्तसंस्थेने शुक्रवारी याची माहिती दिली आहे. उत्तर कोरियाने स्वत:च्या या अंडरवॉटर आण्विक ड्रोनला हाइल-5-23 नाव दिले आहे. कोरियन भाषेत हाइलचा अर्थ त्सुनामी असा होतो. हा ड्रोन समुद्रात शत्रूवर अत्यंत गुपचूपणे हल्ला करण्यास सत्रम आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानकडून अलिकडेच करण्यात आलेल्या संयुक्त सैन्याभ्यासाच्या प्रत्युत्तरादाखल हे परीक्षण करण्यात आले आहे. अमेरिकेच्या सैन्याभ्यासामुळे उत्तर कोरियाला धोका निर्माण झाला असल्याचा दावा वृत्तसंस्थेकडून करण्यात आला.
उत्तर कोरियाने यापूर्वी देखील हाइल ड्रोनचे परीक्षण केले होते. या ड्रोनविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही, परंतु हा ड्रोन अनेक तास पाण्यात राहू शकतो आणि मोठा स्फोट घडवून आणू शकतो असे उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेचे सांगणे आहे.
उत्तर कोरियाने 7 एप्रिल 2023 रोजी अंडरवॉटर आण्विक ड्रोन हाइल-2 चे परीक्षण केले होते. हा ड्रोन लक्ष्यावर हल्ला करण्यापूवीं 71 तासांपर्यंत पाण्यात राहिला होता. त्यावेळीही उत्तर कोरियाने अमेरिका, जपानच्या युद्धाभ्यासाला या प रीक्षणाकरता जबाबदार ठरविले होते. अमेरिका, जपानच्या संयुक्त सैन्याभ्यासामुळे आण्विक युद्धाची स्थिती निर्माण झाली असल्याचे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांनी म्हटले होते.
किरणोत्सर्गाचा धोका
अंडरग्राउंड आण्विक परीक्षण केंद्रातून निघणारी किरणोत्सर्गी सामग्री पाण्यात मिसळत असल्याने दक्षिण कोरिया, जपान आणि चीनला धोका निर्माण झाला आहे. ही किरणोत्सर्गी सामग्री 3 देश आणि 8 शहरांमध्ये पोहोचली आहे. उत्तर कोरियात आण्विक केंद्रानजीक राहणारे सुमारे 10 लाखाहून अधिक लोक स्वत:च्या उपजीविकेसाठी भूजलावर निर्भर आहेत. तसेच उत्तर कोरियातून तस्करीद्वारे येणारी कृषी उत्पादने आणि मत्स्य उत्पादनांमध्ये देखील किरणोत्सर्गी सामग्री असल्याची भीती मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केली आहे.