उत्तर कोरियाने डागली अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे
दक्षिण कोरियाला सतर्कतेचा इशारा
वृत्तसंस्था/ सेऊल
उत्तर कोरियाने पूर्वेकडील लष्करी बंदरावरून अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. या क्षेपणास्त्र सरावामुळे दक्षिण कोरियाने आपली देखरेख आणि दक्षता मजबूत केली आहे. तसेच त्यांनी अमेरिकेशी संपर्क साधत चर्चा केल्याचे समजते. उत्तर कोरियाकडून तणाव वाढवण्याच्यादृष्टीने अशा कारवाया सुरू असल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे. ‘आमच्या सैन्याने शनिवारी सकाळी 8 वाजता उत्तर कोरियाच्या सिन्पो परिसरात अनेक अज्ञात क्रूझ क्षेपणास्त्रे शोधून काढली’ असे दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणाले. मात्र, किती क्षेपणास्त्रे डागली हे त्यांनी सांगितले नाही.
उत्तर कोरियाचा अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांसोबतचा संघर्ष वाढत असतानाच उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आगळीक केली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत कोरियन द्वीपकल्पात तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी आपल्या शस्त्रास्त्र बळकटीकरणाला गती देण्याचा आग्रह धरला आहे. याशिवाय त्याने अमेरिका आणि त्याच्या आशियाई मित्र देशांना अण्वस्त्र संघर्षाची धमकी दिली आहे.