महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर कर्नाटकातील व्यापारी नायजेरियन गुन्हेगारांचे लक्ष्य!

11:23 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजयपूरच्या व्यापाऱ्याला 60 लाखांचा गंडा : विविध ठिकाणांहून एकत्रित कारनामा, गुंतवणुकीवर 200 टक्के परतावा देण्याचे सांगून लुटण्याचा प्रकार

Advertisement

बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विजयपूर, बागलकोट आदी जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढतो आहे. झटपट श्रीमंतीच्या मोहापायी लोक आपली आयुष्यभर कमावलेली पुंजी सायबर गुन्हेगारांच्या घशात घालत आहेत. आधार एनेबल्ड सर्व्हिसच्या नावे होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबरोबरच आता गुंतवणुकीवर 200 टक्के परतावा देण्याचे सांगून सावजांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारात परदेशी गुन्हेगारांचा सहभाग आढळून आला आहे. गेल्या आठवड्यात विजयपूर येथील सीईएनचे पोलीस निरीक्षक रमेश अवजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेंगळूर येथे तिघा नायजेरियन तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सायबर गुन्हेगारी म्हटली, की आजवर फक्त नोयडा, जामतारा, राजस्थान, मुंबई आदी शहरातील गुन्हेगारांची नावे पुढे येत होती. आता या गुन्हेगारांनाही मागे टाकणारी करामत नायजेरियन गुन्हेगारांनी करून दाखविली आहे.

Advertisement

ओवेसीमुद्दीन पीटर (वय 38), इमेका ऊर्फ हॅप्पी (वय 40), ओबिन्ना स्टॅनली (वय 42) सर्व मूळचे राहणार नायजेरिया, सध्या राहणार बेंगळूर अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहेत. क्रिप्टो मायनिंगसाठी जर गुंतवणूक केलात तर 200 टक्के नफा जमा करण्याचे सांगून उत्तर कर्नाटकातील अनेक सावजांकडून या नायजेरियन त्रिकुटाने लाखो रुपये वसूल केले आहेत. विजयपूर येथील एका कापड व्यापाऱ्याला 200 टक्के परतावा देण्याचा विश्वास देऊन त्याच्याकडून 59 लाख 12 हजार 765 रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या खात्यात जमा करून घेतले होते. विजयपूरच्या जिल्हा पोलीसप्रमुख ऋषिकेश सोनवणे, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक रमेश अवजी यांच्या नेतृत्वाखाली सायबर गुन्हेगारांच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकाने 6 ऑक्टोबर 2023 रोजी केनिया येथील एका नागरिकासह पाच जणांना अटक केली होती.

आता याच प्रकरणात नायजेरियातील त्रिकुटाला बेंगळुरात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून सावजांना गंडविण्यासाठी वापरण्यात येत असलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे 21 मोबाईल संच, 18 सीमकार्ड, 1 लॅपटॉप, 2 पेनड्राईव्ह, 1 डोंगल, 2 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले असून गुन्हेगारांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी काही जण फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार शिक्षण व उद्योग-व्यापारासाठी म्हणून भारतात येणारे नायजेरियन तरुण सायबर गुन्हेगारीत उतरले आहेत. विजापूर पोलिसांनी अटक केलेल्या परदेशी गुन्हेगारांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी एक तरुण अभियांत्रिकी शिक्षणासाठी बेंगळुरात आला आहे. तो एक सेमिस्टरही उत्तीर्ण झालेला नाही.

केवळ बेंगळूरच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, गुजरात, मणिपूर व इतर ठिकाणी नायजेरियन गुन्हेगारांचे जाळे आहे. हे सर्व जण एकमेकांशी जोडलेले असतात. एक तरुण तर धारवाडमध्ये बसून सावजांना ठकवत होता. ते सहजासहजी पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. एकदा हात मारला तर मोठेच सावज त्यांच्या जाळ्यात अडकते. जगात कोणतीही संस्था आपण केलेल्या गुंतवणुकीला 200 टक्के परतावा किंवा नफा देत नाही. नायजेरियन गुन्हेगार मात्र सावजाशी संपर्क साधून तुमच्याजवळ आहे तितका पैसा गुंतवा आणि 200 टक्के परतावा मिळवा, असे सांगून सावजाचा विश्वास संपादन करतात. एक-दोन वेळा छोटी-मोठी रक्कम सावजाच्या खात्यात जमा केली जाते. सावजाकडून लाखो रुपये मिळाले, की लगेच त्याच्याशी संपर्क तोडून टाकतात. तेव्हाच आपण फसलो गेलो, हे सावजाच्या लक्षात येते.

तिघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य

नायजेरियन गुन्हेगारांना अटक करण्याचे मोठे आव्हान विजापूर पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलीसप्रमुख ऋषिकेश सोनवणे, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश अवजी, उपनिरीक्षक मल्लिकार्जुन तळवार, पी. वाय. अंबीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल आठवडाभराहून अधिक काळ बेंगळूरमध्ये तळ ठोकून या नायजेरियन गुन्हेगारांना अटक केली आहे. तिघा जणांपैकी पीटर हा सीकेपाळ्या येथे, इमेका हा टीसीपाळ्या येथे तर ओबिन्ना हा निलसंद्रा येथे राहतो. तिघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य असले तरी तिघेही एकमेकांच्या संपर्कात राहून विजयपूरच्या कापड व्यापाऱ्याला 59 लाख 12 हजार 765 ऊपयाला ठकविले आहे. झटपट श्रीमंती आणि 200 टक्के परताव्याच्या हव्यासापायी कोणीही फशी पडू नये, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article