Kolhapur Politics: उत्तर मतदार संघातले उमेदवार Raju Latkar आहेत तरी कोठे?
राजू लाटकर कोठे आहेत, हा उलट-सुलट चर्चेचा विषय झालाय
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातले उमेववार राजू लाटकर निवडणूक काळात घडलेल्या एका मोठ्या राजकीय खेळीमुळे राज्यभरात चर्चेत आले. पण आता निवडणुकीनंतर हे 'राजू लाटकर आहेत तरी कोठे असे म्हणायची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.
कोल्हापूर राज्यात, गेल्या महिन्याभरात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक महत्वाच्या घडामोडी राजकारणात घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजू लाटकर कोठे आहेत, हा उलट-सुलट चर्चेचा विषय झाला आहे. कारण विधानसभा निवडणुकीतील काही मोठ्या घडामोडीचे ते एकमेव साक्षीदार आहेत. कुकरमध्ये वाफ जशी साचते आणि योग्य वेळी ती कशी बाहेर पडते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कारण या निवडणुकीत राजू लाटकर यांचे कुकर हे चिन्ह होते. या विधानसभा निवडणुकीत राजू लाटकर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झाले होते. पण त्यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली गेली.
पक्षाने उमेदवारी रद्द केली असली तरी लाटकर यांनी माघार घेतली नाही. उलट ते उमेदवारी मागे घेणार नाहीत, याचा अंदाज येताच काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी अगदी शेवटच्या क्षणी माघार घेतली. आणि उमेदवारी नाकारलेल्या पण आत्ता उमेदवारी यादीत असलेल्या लाटकर यांच्यामागे बळ देण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली.
या घडामोडीमुळे निवडणुकी आधीच कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणाची चर्चा राज्यभर जाऊन पोहोचली. या घडामोडी सर्वसामान्य मतदारांना नव्हे तर, मोठ्या-मोठ्या राजकारणी मंडळींनाही कोड्यात टाकून गेल्या. त्याचा परिणाम नक्कीच प्रचारावर झाला. आणि या वातावरणाचा फायदा शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी व्यवस्थित घेतला.
क्षीरसागर दणदणीत मतांनी निवडून आले किंवा काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याक्षणीच क्षीरसागर यांच्या विजयाचा मार्ग अगदी आरामात खुला झाला होता. किंबहुना यासाठीच या राजकीय घडामोडी घडल्या, अशी बेट चर्चा सुरू झाली.
या घडामोडीमुळे कोल्हापूर शहरात विशेषतः सदर बाजार, शाहू कॉलेज, शिवाजी पार्क परिसरात वर्चस्व असलेल्या राजू लाटकरांच्या नावाची चर्चा राज्यभर पोहोचली. या चर्चेबरोबर राजू लाटकर यांना अर्ज माघारीच्या दिवशी माघार घेण्यासाठी घेऊन येण्यात काँग्रेसचे नेते कमी का पडले?
माघारीच्या दिवशी लाटकर कसे अज्ञातवासात गेले? त्या काळात ते कोठे राहत होते? किंवा त्यांना आता अजिबात माघार घेऊ नका, असे सांगणारे कोण कोण होते? हे सारे प्रश्न आणखी गडद झाले आणि काहींच्या ओठावर या प्रश्नाचे उत्तर असतानाही ते चिडीचूप राहिले.
अलीकडे शिवसेना ठाकरे गटातील संजय पवार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवी इंगवले यांच्यातील मतभेदामुळे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी या प्रश्नावरची वाळत आलेली खपली पुन्हा काढली. आपल्या पक्षातील घडामोडीवर बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीतील राजू लाटकर यांची उमेववारी आणि त्या काळात घडलेल्या काही रहस्यांचा भेद करण्याची गर्मित धमकीच महाविकास आघाडीला दिली.
त्यामुळे पुन्हा राजू लाटकर यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मधुरिमाराजेंना चालून आलेली आमदारकीची संधी कशी आणि कोणी-कोणी घालवली आणि त्यासाठी राजू लाटकर या मोहऱ्याचा वापर कसा केला गेला, याची प्रत्येक जण मिळेल तेवढ्या अल्प माहितीवर चर्चा रंगवत राहिले.
मी कामातच आहे
राजू लाटकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी मी नेहमीप्रमाणे माझ्या सार्वजनिक कामात आहे. राजकारणात जे काही घडलं, त्याचा फारसा विचार न करता मी जनतेच्या सेवेत कायम आहे. सार्वजनिक समारंभात पण मी पूर्वीसारखाच सक्रिय आहे. अर्ज भरण्याच्या काळात जे काही घडलं असेल ते मला फारसे माहिती नाही. पण महाविकास आघाडीने मला या निवडणुकीत चांगले सहकार्य केले आणि चांगले मताधिक्यही मिळवून दिल्याचे सांगितले.
लाटकर हे पूर्वाश्रमी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते. पूज्य साने गुरुजी, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, ना. ग. गोरे, मधु दंडवते, मुणाल गोरे यांच्या पठडीतले. पण शहराच्या राजकारणात महादेवराव महाडिक यांच्या विचारांचे. त्यानंतर लाटकर महाडिक यांच्या गटातूनही बाहेर पडले. त्यांच्या पत्नी सुरमंजिरी लाटकर या महापौर झाल्या. महाडिक गटानंतर ते कॉंग्रेसमध्ये सतेज पाटील यांच्या गटात गेले. विधानसभेला त्यांना उमेदवारीही दिली.
आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पण राजकारणातील अतिशय विचित्र अशी घडामोड त्यांनी अनुभवली. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर ते सार्वजनिक समारंभात खूप कमी दिसू लागले. आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध असलेले लाटकर व्यासपीठावर खूप कमी वेळा आले. कुठे गेले राजू लाटकर, असे लोक विचारू लागले. पण निवडणुकीतल्या काठी रहस्यमय घडामोडीचे क्षण आपल्यासोबत घेऊन त्यांनी बाजूला राहणेच पसंत केले.