पंजाबमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीत
वृत्तसंस्था / चंदीगढ
शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांनी राज्यात बंद पुकारला आहे. रेल्वे मार्गांवर शेतकऱ्यांनी ठाण मांडल्याने पंजाबमधून अन्य राज्यांमध्ये जाणाऱ्या 150 रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. या बंदला काही शेतकरी संघटना आणि शेतमाल व्यापारी संघटनांनी विरोध केला असूनही सोमवारी बंद पाळला गेला आहे.
या बंदमध्ये पंजाबमधील दोन शेतकरी संघटनांचा प्रामुख्याने सहभाग आहे. बंदचे आव्हान लक्षात घेता राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था वाढविली असून अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. सोमवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच बंदला प्रारंभ करण्यात आला होता. अनेक शेतकरी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. या दोन संघटनांनी 13 मागण्या केल्या आहेत. पंजाब राज्य सरकारने बंदनिमित्त सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेशही लागू केला आहे.
एक दिवसाचा लाक्षणिक बंद
या बंदला अनेक शेतकरी संघटना आणि व्यापारी संघटनांनी विरोध केल्याचे रविवारीच स्पष्ट झाले होते. असा बंद करुन काहीही उपयोग होणार नाही. उलट व्यापार आणि सर्वसामान्य ग्राहक यांना त्रास होणार आहे, असे वक्तव्य रविवारी कृषीमाल व्यापाऱ्यांच्या संघटनेने केले होते. सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून कृषीउत्पादनांची खरेदी होत आहे. या खरेदीतही या बंदचा अडथळा येऊ शकतो आणि शेतकऱ्यांची हानी होऊ शकतो. त्यामुळे बंदच्या स्थानी अन्य पर्यायांचा विचार व्हावा, असे आव्हानही अनेक संघटनांनी केले होते. तरीही, बंद पुकारण्यात आला. मात्र, फारसा पाठिंबा मिळणार नाही, हे लक्षात आल्याने तो एक दिवसापुरता मर्यादित ठेवण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोमवारी चार वाजता समाप्ती
या एक दिवसाच्या लाक्षणिक बंदची समाप्ती सोमवारी दुपारी चार ते साडेचार वाजता करण्यात आली. काही स्थानी तो संध्याकाळी सहा पर्यंत चालला. बंदचा कालावधी संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे आणि इतर सेवा पूर्ववत करण्यात आल्या. मात्र, बंदच्या काळात अनेक प्रवाशांना रेल्वे स्थानकांमध्येच किमान 10 ते 12 तास अडकून पडावे लागले. रेल्वेचे वेळापत्रक या एक दिवसाच्या बंदमुळे अस्ताव्यस्त झाले. विशेषत: उत्तर भारतात याचा परिणाम जाणवला. पंजाबमध्ये जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या पंजाबच्या सीमेवरच थांबविण्यात आल्या. तर पंजाबमधून बंदच्या काळात एकही रेल्वे बाहेर पडू शकली नाही.
200 स्थानी बंद
पंजाबच्या सर्व भागांमधून एकंदर 200 स्थानांवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. काही ठिकाणी महामार्गही आडविण्यात आले. आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्यात आले. त्यामुळे कोठेही अवांछनीय प्रसंग घडला नाही. बंदमध्ये साधारणत: 10 हजार शेतकऱ्यांनी भाग घेतला असावा असे अनुमान आहे. बंदसाठी जमलेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
डल्लेवाल अत्यवस्थच
संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. ते गेल्या 30 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्राणातिक उपोषण करीत आहे. त्यांच्या जीवास अपाय झाल्यास त्याचे उत्तरदायित्व पंजाब सरकारवर असेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी दिला होता. पंजाब सरकार त्यांच्यावर प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. प्रकृती अधिक बिघडल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी सज्ज्ता करण्यात आली आहे.
मागण्या काय आहेत ?
कृषी मालाच्या किमान आधारभूत दराला कायदेशीर मान्यता देण्यात यावी. त्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा. राज्य सरकारांनीही याचा पाठपुरावा करावा, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. पूर्वीच्या आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हा काढून टाकण्यात यावेत. किमान आधारभूत दरात वाढ करावी. शेतकऱ्यांना किफायतशीर अटींवर कर्जे देण्यात यावीत, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत.