For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीच्या रणांगणात केजरीवालांविरुद्ध प्रवेश वर्मा

06:58 AM Jan 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीच्या रणांगणात केजरीवालांविरुद्ध प्रवेश वर्मा
Advertisement

आतिशी विरुद्ध रमेश बिधुरी : दिल्ली विधानसभेसाठी भाजपची 29 जणांची पहिली यादी जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत 29 नावे समाविष्ट असून 16 जागांवर उमेदवार बदलण्यात आले आहेत. तर 13 जागांवर विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. प्रवेश वर्मा नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. कालकाजीमधून विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात भाजपने रमेश बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून काँग्रेसने अलका लांबा यांना तिकीट दिल्यामुळे येथे तिरंगी लढत अपेक्षित आहे.

Advertisement

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. पुढील महिन्यात मतदान होण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा अपेक्षित आहे. उंबरठ्यावर ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने सर्व 70 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसनेही आतापर्यंत तीन याद्यांच्या माध्यमातून 48 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता भाजपने आपल्या पहिल्याच यादीत 29 उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपतर्फे कोणत्या मतदारसंघातून कोण?

भाजपने आदर्श नगरमधून राजकुमार भाटिया, बदलीमधून दीपक चौधरी, रिठाळामधून कुलवंत राणा, नांगलोगाई जाटमधून मनोज शौकीन, मंगोलपुरीमधून राजकुमार चौहान, रोहिणीमधून विजेंद्र गुप्ता, शालीमार बागमधून रेखा गुप्ता, मॉडेल टाउनमधून अशोक गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तसेच करोल बागमधून दुष्यंत कुमार गौतम, पटेलनगर येथून राजकुमार आनंद, राजौरी गार्डनमधून सरदार मनजिंदर सिंग सिरसा, जनकपुरीमधून आशिष सूद, बिजवासनमधून कैलाश गेहलोत, नवी दिल्लीतून प्रवेश साहिबसिंग वर्मा, जंगपुरामधून सरदार तरविंदर सिंग मारवाह, मालवीय नगरमधून सतीश उपाध्याय, आरके पुरममधून अनिल शर्मा, मेहरौलीमधून गजेंद्र यादव, छतरपूरमधून कर्तारसिंग तन्वर, आंबेडकर नगरमधून खुशीराम चुनार, कालकाजी येथून रमेश बिधुरी, बदरपूर येथून नारायण दत्त शर्मा, पटपडगंजमधून रवींद्र सिंह नेगी, विश्वास नगरमधून ओम प्रकाश शर्मा, कृष्णानगरमधून डॉ. अनिल गोयल, गांधीनगरमधून सरदार अरविंदर सिंग लवली, सीमापुरीमधून कुमारी रिंकू, रोहतासनगरमधून जितेंद्र महाजन आणि घोंडा येथून अजय महावर यांना तिकीट देण्यात आले आहे.

उमेदवार निवडीत ‘आप’ची आघाडी

आम आदमी पक्षाने सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. कालकाजीमधून मुख्यमंत्री आतिशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलासमधून तर सत्येंद्र जैन हे शकूर बस्तीमधून निवडणूक लढवणार आहेत. ‘आप’ने 21 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान म्हणजेच 25 दिवसांत एकूण 4 याद्यांमध्ये 70 उमेदवारांची नावे जाहीर केली. यावेळी 26 विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. तर मनिष सिसोदिया यांच्यासह 4 आमदारांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत.

काँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी

काँग्रेसच्या तीन याद्या जाहीर झाल्या असून काँग्रेस महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 3 यादीत 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसची 21 जणांची पहिली यादी 12 डिसेंबरला जाहीर केली होती. दुसरी यादी 24 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली. त्यात 26 नावे होती.

निवडणुकांची घोषणा आठवडाभरात शक्य

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत असल्यामुळे निवडणूक आयोग जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकत पूर्ण बहुमत प्राप्त केले होते.

Advertisement
Tags :

.