प्रचारात रंगत बिगरराजकीय ‘ताऱ्यां’ची
आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार यंदा बहुढंगी आणि बहुरंगी पद्धतीने होत आहे. या प्रचारात स्वत: व्यावसायिक राजकारणी नसलेले, पण जनसामान्यांवर प्रभाव असणारे असे लोकप्रिय मान्यवरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या समाविष्ट होत आहेत. सोशल मिडियाच्या आजच्या युगाने ‘मिडिया इन्फ्ल्युएन्सर्स’ नामक एक नवी मानव ‘प्रजाती’ उत्क्रांत केली आहे. या मान्यवरांचा सोशल मिडियाच्या विविध प्रकारांवर, अर्थात, युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स इत्यादी माध्यमांमधून कोट्यावधी लोकांवर मोठा प्रभाव असतो. त्यांचा उपयोग मते मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी करुन न घेतला तर ते आश्चर्य ठरते. या प्रक्रियेची काहीशी झलक 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलीच होती. आता यंदाच्या निवडणुकीत तिची व्याप्ती आणि प्रभाव अधिकच वाढला असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर अलिकडे मोबाईल गेमिंग नामक प्रकाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अत्यंत कल्पकपणे या मोबाईल गेम्सची निर्मिती केली जाते. तरुणाईला तर या गेम्सच्या आधीन झाली आहे, असे म्हटले जाते. या गेमिंग प्रकारांचा आणि गेमर्सचाही उपयोग निवडणूक प्रचारात थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे करुन घेतला जाणार, हे निश्चित. आजच्या या विशेष निवडणूक पृष्ठात या नव्या आणि अनोख्या प्रचारतंत्राचा आढावा घेऊ. तसेच 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांचाही परामर्ष आपण घेणार आहोत. यंदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी या दोन निवडणुकांवर दृष्टीक्षेप करणे आवश्यक आहे.
निवडणुकीची ‘स्टार व्हॅल्यू’
प्रत्येकाच्या आयुष्यावर सध्या ‘सोशल मिडिया’ चा दांडगा प्रभाव दिसून येत आहे. कोणतेही क्षेत्र असो, सोशल मिडियाशिवाय पान हलत नाही, अशी अनेकांची स्थिती असते. निवडणुकाही या प्रभावापासून कशा अलिप्त असतील ? विशेषत: 2024 ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी सोशल मिडियावर अन्य माध्यमांपेक्षा अधिक प्रमाणात अवलंबून आहे, असे दिसते. साहजिकच, प्रत्येक राजकीय पक्ष सोशल मिडियाला आपलेले करुन घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांप्रमाणच, प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध नसलेल्या (किंवा नसल्याचे भासविणाऱ्या) मिडिया ‘इन्फ्ल्यूएन्सर्स’ना या निवडणुकीत प्रथमच प्रचारकांची ‘स्टार व्हॅल्यू’ प्राप्त झाल्याचे बघावयास मिळते. तेव्हा निवडणूक प्रचाराच्या या भागाचाही परामर्ष घेऊन त्याच्या साधकबाधकतेचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. हे मिडिया इन्फ्ल्यूएन्सर्स अनेक क्षेत्रांमधील आहेत. त्यांच्यात कलाकार, फॅशन डिझायनर्स पासून गेमर्सपर्यंत अनेकांचा समावेश आहे. अशांपैकी काही मान्यवरांचा परिचय आणि त्यांची कार्यपद्धती माहिती करुन देण्याचा हा प्रयत्न...
जान्हवी सिंग
ड यांनी अत्यंत कमी वयातच हिंदू तत्वज्ञान तज्ञ म्हणून कीर्ती प्राप्त केली आहे. त्यांचे वय अवघे 20 वर्षे आहे. सोशल मिडियावरुन त्या हिंदू धर्म, हिंदू धर्माच्या परंपरा आणि हिंदू धर्मग्रंथांचे अर्थ स्पष्ट करत असतात. पारंपरिक हिंदू वेषभूषांसंबंधी त्या महिती देतात. त्यांनी अशा वेषभूषांची प्रदर्शने आयोजित केली आहेत. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडियावर त्यांचे 4 कोटी फॉलोअर्स असल्याचे दिसून येते. त्यांचा कल भारतीय जनता पक्षाकडे आहे.
ड त्यांना हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘कोलॅबोरेशन विथ माय गव्हर्नमेंट’ या कार्यक्रमात त्या सहभागी आहेत. आपण थेट राजकारणात नाही आहोत. तसेच आपल्या फॉलोअर्सना कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला मत द्या असा संदेश आपण देत नाही. तथापि, भारतीय जनता पक्षाने ‘हिंदुत्वा’वर केंद्रीत केलेले लक्ष आपल्याला भावते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी सर्वात चांगले नेते आहेत, असे त्यांचे मत आहे.
- मैथिली ठाकूर
ड तरुण वयात भक्तीपदांच्या गायनामध्ये देशभर ख्याती मिळविलेली ही गायिका आहे. युट्यूब किंवा अन्य सेशल मिडियांवरच्या त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 5 कोटींहून अधिक असल्याचे बोलले जाते. त्यांनी अनेक भाषांमध्ये हिंदू धर्म आणि भक्तीपर गीते, तसेच जनपदे गायिली असून त्यांच्यातील अनेक अत्याधिक लोकप्रिय आहेत. त्यांनी गायिलेले मराठी अभंग आणि भक्तिगीतेही गाजलेली आहेत.
ड या गायिकेचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. कोणत्याही राजकीय पक्षाशी त्या बांधलेल्या नाहीत. त्यांची निवड निवडणूक आयोगाने ‘दूत’ म्हणून केलेली असल्याने त्या कोणत्या पक्षाचा प्रचार करुही शकत नाहीत. तथापि, त्यांच्या हिंदू धर्माशी संबंधित भक्तीपर गीतांमुळे मतदारांपर्यंत कोणाला मतदान करायचे याचा ‘योग्य तो संदेश’ जातो, असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.
ड नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावरच्या 24 इन्फ्ल्युएंन्सर्सना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्यामध्ये मैथिली ठाकूर यांचाही समावेश होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून पारितोषिक स्वीकारले, याचाच अर्थ त्यांचा कल भारतीय जनता पक्षाकडे आहे, अशी टीका अनेक संशयात्म्यांनी केली. संवेदनशील राजकारणात अशी टीका केली जाते.
ड अनेक सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर्स असे आहेत, की जे सध्याच्या सरकारच्या उजव्या विचारसरणीशी बांधील आहेत आणि ते सध्या सत्तेवर असणाऱ्या सरकारसाठी व्हिडीओ निर्माण करतात, असे मैथिली ठाकूर यांनीच म्हटले आहे. हिंदू विचारसरणीसंबंधात आज मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. याचा आपल्याला लोकप्रियतेच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्टीनेही लाभ होईल असे अनेक मानतात.
- अनिकेत बय्यनपुरिया
ड हे माजी कुस्तीपटू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलेल्या 24 मान्यवरांमध्ये यांचाही समावेश होता. ते सोशल मिडियावरुन ‘फिजिकल फिटनेस’ (शरीरस्वास्थ्य) याविषयी माहिती देतात. तसेच समुपदेशनही करतात. अनेक लोक त्यांचा सल्ला घेतात. त्यांचे फॉलोअर्सन 80 लाख आहेत.
ड आपल्या या सोशल मिडिया स्टार व्हॅल्यूचा लाभ ते उघडपणे भारतीय जनता पक्षाला मिळवून देतात. भारतीय जनता पक्षाला मतदान करा, असे स्पष्ट आवाहन ते आपल्या फॉलोअर्सना करतात. ते स्वत: या पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते किंवा सदस्य नाहीत. पण भारतीय जनता पक्षाची विचारसरणी त्यांना मान्य आहे.
ड आपला राजकीय कल त्यांनी लपविलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांना आदर आहे. ही बाबही त्यांनी कधी लपविलेली नाही. आपल्या लोकप्रियतेचा उपयोग एखाद्या पक्षाला करुन देणे यात काहीही चुकीचे नाही, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. तरीही त्यांच्यावर काही जणांनी टीका केलेली आहे.
- रणवीर अलाहाबादिया
ड यांचा जन्म मुंबईत झालेला आहे. त्यांचे शिक्षण इंजिनिअरींगचे आहे. आपल्या प्रसन्न आणि स्वस्थ व्यक्तिमत्वासाठी ते प्रसिद्ध आहेत. तेही शरीरस्वास्थ्यतज्ञ असून 2015 मध्ये त्यांनी युट्यूब करीअरचा प्रारंभ केला. त्यांची युट्यूबवर ‘बिअरबायसेप्स’ नावाची वाहिनी आहे. ती अल्पावधीच लोकप्रिय झालेली आहे.
ड त्यांनी 2019 मध्ये आपल्या वाहिनीचे रुपांतर पॉडकास्टमध्ये केले आहे. या पॉडकास्टवर आतापर्यंत किरण बेदी, अभिषेक बच्चन, सद्गुरु, आयुष मेहरा आदी मान्यवरांना आमंत्रित केलेले आहे. ‘दी रणवीर शो’ हा त्यांचा कार्यक्रमही अतिशय लोकप्रिय आहे. यांच्या फॉलोअर्सची संख्या अनेक कोटी असल्याचे दिसून येते.
ड केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी रणवीर अलाहाबादिया यांच्या युट्यूब चॅनेलवर उपस्थिती नोंद केली आहे. अलाहाबादिया यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. तरी राजकीय नेते त्यांच्या संपर्कात असतात. त्यांची लोकप्रियता त्यांना आकर्षित करत असते.