विधानपरिषदेवर चौघांचे नामनिर्देशन
सरकारची शिफारस : राज्यपालकांकडून नेमणूक
प्रतिनिधी/ बेंगळूर
कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या चार जागांवर सरकारने नामनिर्देशन केले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या (केपीसीसी) प्रसार माध्यम विभागाचे अध्यक्ष रमेश बाबू, केपीसीसीच्या एनआरआय सेलच्या प्रमुख आरती कृष्ण, हुबळी-धारवाडमधील दलित नेते एफ. एच. जक्कप्पन्नवर आणि मूळचे म्हैसूर येथील पत्रकार शिवकुमार के. यांचे विधानपरिषदेवर नामनिर्देशन करण्यात आले आहे. राज्यपालांनी राज्यघटनेच्या कलम 171(3)(ई) अंतर्गत या चौघांची विधानपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याने रविवारी या संबंधीचा आदेश जारी केला आहे.
चिक्कमंगळूर जिल्ह्यातील बेगणे येथील गोपाल एम. कृष्णा यांच्या पत्नी डॉ. आरती कृष्णा यांना विधानपरिषदेसाठी नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्या शृंगेरी तालुक्मयातील आहेत. याचबरोबर हुबळीतील हेगेरी येथील रहिवासी असलेले स्वातंत्र्यसैनिक दि. हणमप्पा यांचा मुलगा एफ. एच. जक्कप्पनवर, म्हैसूरच्या श्रीरामपूर येथील रहिवासी ए. कृष्णप्पा यांचे पुत्र शिवकुमार के. यांना काँग्रेस पक्षाने नामनिर्देशन केले आहे. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे. तीन नवीन नामांकनांसह बेंगळूरचे रहिवासी रमेश बाबू यांना राज्यपालांनी विधानपरिषदेवर नामनिर्देशन केले आहेत. रमेश बाबू यांचा कार्यकाळ 21 जुलै 2026 पर्यंत असेल. विधानपरिषदेचे सदस्य सी. पी. योगेश्वर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्त्या घटनात्मक तरतुदींनुसार करण्यात आल्या आहेत, असे लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 74 आणि कलम 156(2) अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. हा आदेश राज्यपालांच्या नावे जारी करण्यात आला असून त्यावर सरकारच्या कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याचे (निवडणुका) सचिव मधू ए. सी. यांनी स्वाक्षरी केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन आठवड्यांपूर्वी या चौघांच्या नावाची शिफारस करून नामनिर्देशन करण्याची विनंती राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी या चौघांच्या नावांना मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यू. बी. वेंकटेश, प्रकाश राठोड, के. ए. तिप्पेस्वामी, सी. पी. योगेश्वर यांच्यामुळे रिक्त झालेल्या चार जागांसाठी नामनिर्देशन करण्यात आले आहे.