Satara : 'या' तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज सातारा नगरपालिका सभागृहात स्वीकारले जाणार
सातारा नगरपरिषद निवडणूक 2025: राजकीय पक्षांची बैठक संपन्न
सातारा : सातारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची बैठक सातारा नगरपालिका कार्यालयातील श्री. छ. शिवाजी महाराज सभागृहात दि. 07 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता घेण्यात आली. या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार समीर यादव आणि सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते.
बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, स्थानिक आघाडीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजीच्या पत्रानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक काळात करावयाचे व न करावयाचे मुद्दे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत निवडणूक कार्यक्रमाचा आढावा घेताना सांगण्यात आले की उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र mahasecelec.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. ऑनलाईन पद्धतीने भरलेले नामनिर्देशन पत्र दि. 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत श्री. छ. शिवाजी महाराज सभागृहात स्वीकारले जातील.
नामनिर्देशन पत्रांची छाननी व मागे घेण्याची अंतिम मुदत 19 ते 21 नोव्हेंबर असून, अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. मतदान 02 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी 03 डिसेंबर रोजी D.M.O गोदाम, नवी MIDC कोडोली, सातारा येथे होईल.
प्रचार समाप्तीची वेळ मतदानापूर्वी 24 तास म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीपासून लागू होईल. उमेदवारांच्या खर्च मर्यादेबाबत माहिती देताना सदस्यपदासाठी 5 लाख व थेट नगराध्यक्ष पदासाठी 15 लाख रुपये इतकी मर्यादा असल्याचे सांगण्यात आले.
मुख्याधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जळक यांनी नामनिर्देशन पत्रातील सर्व रकाने पूर्णपणे भरावेत, कोणताही रकाना रिकामा ठेवू नये अशा सूचना दिल्या.