डिंपल यादवांनी भरला उमेदवारी अर्ज
मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ः सप अध्यक्षांची पत्नी
@ वृत्तसंस्था / मैनपुरी
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादवा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सपने मुलायम यांच्या मतदारसंघात अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी दिली आहे. मुलायम यांच्या या मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी डिंपल यादव यांनी सोमवारी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
तेजप्रताप यादव यांच्यासोबत डिंपल यादव अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. यादरम्यान अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव हे तेथे पोहोचल्यावर डिंपल यांनी स्वतःचा अर्ज भरला आहे.
नेताजींना (मुलायम सिंह यादव) नमन करत माझी उमेदवारी त्यांच्या मूल्यांना समर्पित करत आहे. नेताजींचा आशीर्वाद आम्हा सर्वांसोबत नेहमीच राहिला आहे आणि नेहमी राहणार असल्याचे डिंपल यांनी ट्विट करत म्हटले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मैनपुरी येथे जाण्यापूर्वी डिंपल यांनी पती अखिलेश यादव यांच्यासोबत मुलायम सिंह यादवांच्या समाधीस्थळावर पोहोचून पुष्पांजली अर्पण केली होती.
डिंपल यादव उमेदवारी अर्ज भरताना यादव कुटुंबातील जवळपास सर्व सदस्य मैनपुरी येथे पोहोचले होते. परंतु शिवपाल यादव दिसून आले नाहीत. शिवपाल यांना विचारूनच उमेदवार घोषित करण्यात आला असल्याने ते आले किंवा नाही आले तरी कुठलाच फरक पडणार नसल्याचा दावा रामगोपाल यादव यांनी केला आहे. मुलायम सिंह यादवांचा बालेकिल्ला वाचविण्यासाठी समाजवादी पक्षाने यावेळी पक्षाध्यक्षांच्या पत्नीलाच निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. तर भाजपकडून यावेळी मुलायम यांची दुसरी सून अपर्णा यादव यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.