नोएल टाटा सांभाळणार उत्तरदायित्व
रतन टाटा यांच्या वारसदाराच्या नावाची घोषणा : टाटा उद्योगसमूहाची सूत्रे सांभाळणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा उद्योगसमूहाचे दिवंगत प्रमुख रतन टाटा यांचे वारसदार म्हणून त्यांचे सावत्र बंधू 67 वर्षांचे नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी टाटा कुटुंबाकडून करण्यात आली. नोएल टाटा यांच्यावर टाटा विश्वस्त निधी संस्थांचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. ते टाटा कुटुंबाच्या सर दोराबजी टाटा न्यासाचे 11 वे अध्यक्ष, तर सर रतन टाटा न्यासाचे सहावे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. टाटा विश्वस्त न्यासांकडे टाटा सन्स या होल्डिंग कंपनीचे 66 टक्के समभाग आहेत. टाटा सन्स ही होल्डिंग कंपनी टाटा उद्योगसमूहाचे संचालन करते. त्यामुळे आता नोएल टाटा यांच्या हाती या टाटा उद्योगसमूहाची सूत्रे देण्यात आली असल्याचे स्पष्ट होत आहे.
रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांच्या वारसदाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापुढे नोएल टाटा हेच टाटा घराण्याच्या उद्योगसम्राज्याचे प्रमुख या नात्याने कार्य करणार असल्याची माहिती देण्यात आली.
नोएल टाटा यांचा अल्पपरिचय
नोएल नवल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. सध्या ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम पहात आहेत. त्यांचा जन्म दिवंगत नवल टाटा यांच्या द्वितीय पत्नी सिमोन यांच्यापासून झालेला आहे. ते सर दोराबजी टाटा विश्वस्त संस्था आणि सर रतन टाटा विश्वस्त संस्था या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांचे विश्वस्त सदस्यही आहेत.
शैक्षणिक, कौटुंबिक माहिती
त्यांचा जन्म 1957 चा आहे. ते ब्रिटनच्या ससेक्स विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांनी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अभ्यासक्रम आयएनएसईएडीमधून पूर्ण केला आहे. त्यांना माया, नेव्हेली आणि लीह अशी तीन अपत्ये असून ही तिन्ही मुले टाटा कुटुंबाच्या विविध धर्मादाय संस्थांमध्ये तसेच या कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या विश्वस्त संस्थांमध्ये कार्यरत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
नेतृत्वाची पार्श्वभूमी
नोएल नवल टाटा यांच्याकडे व्यासायिक अनुभव मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ते टाटा कुटुंबाच्या विविध विश्वस्त संस्थांमध्ये सक्रिय आहेत. तसेच ते ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे ते टाटा स्टील्स आणि टायटन या कंपन्यांचे उपाध्यक्ष आहेत. या सर्व कंपन्यांच्या प्रगतीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. 2014 पासून ते ट्रेंट या वस्त्रविक्री कंपनीचे प्रमुख म्हणून कार्यरत असून ही कंपनी नावारुपाला येण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांच्या कार्यकाळात ट्रेंट या कंपनीचे समभाग गेल्या 10 वर्षांमध्ये 6 हजार टक्के किंवा 60 पट वधारले आहेत. त्यामुळे टाटा उद्योगसमूहात ही एक वैभवी कंपनी म्हणून ओळखली जाते. नोएल टाटा यांच्या नेतृत्वात या कंपनीचा देशभरात विस्तार झाला असून किरकोळ विक्री केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
टाटा इंटरनॅशनलचाही विस्तार
नोएल टाटा 2010 ते 2021 या कालावधीत टाटा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात या कंपनीची उलाढाल 50 कोटी डॉलर्सपासून 300 कोटी डॉलर्सपर्यंत वाढली आहे. रतन टाटा यांच्या नेतृत्वाच्या काळात टाटा उद्योगसमूह खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा बनला. या कार्यात त्यांना नोएल टाटा यांनीही मोठे सहकार्य केले. त्यामुळे ते टाटा उद्योगसमूहाचे उत्तरदायित्व सुयोग्यपणे सांभाळतील असा विश्वास जाणकारांना वाटत आहे.
मोठी आव्हाने समोर
प्रचंड विस्तार झालेल्या टाटा उद्योगसमूहाचे नेतृत्व करणे ही सहजसाध्य बाब नाही. नोएल टाटा यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. नव्या काळातील नव्या मागण्यांच्या अनुसार समूहाचे कार्य चालविणे, देशांतर्गत आणि जागतिक स्पर्धेशी दोन हात करणे, समूहाचा अधिक विस्तार करणे, समूहाची बहुविधता सांभाळणे आणि वाढविणे अशा अनेक आघाड्यांवर त्यांना नेतृत्व करायचे असून ते यासाठी सक्षम आहेत, असे मत उद्योगक्षेत्रातील अभ्यासकांचे आहे.