जपानच्या निहॉन हिदानक्यो संस्थेला शांततेचा नोबेल
अण्वस्त्रमुक्त जग निर्माण करण्यासाठीच्या मोहीमेचा गौरव
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
‘निहॉन हिदानक्मयो’ या जपानी संस्थेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने केलेल्या पोस्टनुसार जपानी संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला. या संस्थेने हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी मोठे काम केले आहे. जग अण्वस्त्रमुक्त होण्यासाठी ही संस्था काम करते. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नोबेल पुरस्कार निवड समितीने ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत शांतता पुरस्कारासंबंधी माहिती दिली. एका जपानी संस्थेला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीकडून सांगण्यात आले आहे. सोमवारपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. याचदरम्यान शुक्रवारी शांततेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यापूर्वी 2023 मध्ये इराणी महिला पत्रकार आणि कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कांसाठी लढल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. 51 वषीय नर्गिस इराणच्या अवान तुऊंगात कैद आहेत. त्याला आतापर्यंत 13 वेळा अटक करण्यात आली आहे. नोबेल शांतता पुरस्कार 1901 मध्ये सुरू झाला. आतापर्यंत 111 लोकांना आणि 31 संस्थांना हा सन्मान मिळाला आहे.
जगात अण्वस्त्रांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल ‘निहॉन हिदानक्मयो’ला हा सन्मान देण्यात आला आहे. या संघटनेत दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून वाचलेल्यांचा समावेश आहे. त्यांना ‘हिबाकुशा’ म्हणतात. हे हिबाकुशा ‘निहॉन हिदानक्मयो’ संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या दु:खाच्या आणि वेदनादायक आठवणी जगभर शेअर करत असतात. “एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी व अनुभव जगासोबत शेअर करत राहतील. जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देतील,” असे नोबेल निवड समितीने म्हटले आहे.
हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर संघटना स्थापन
‘निहॉन हिदानक्मयो’ संघटनेची स्थापना 1956 मध्ये अणु आणि हायड्रोजन बॉम्ब विऊद्ध दुसऱ्या जागतिक परिषदेदरम्यान झाली. अमेरिकेने 1954 मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती आणि त्याला विरोध करण्यासाठी 1955 मध्ये जागतिक परिषद सुरू झाली होती. 1945 मध्ये झालेल्या अणुहल्ल्याला जवळपास 10 वर्षे उलटून गेल्यानंतरही अमेरिकेकडून पीडितांना कोणतीही मदत मिळाली नाही. अमेरिकेच्या लष्कराने पीडितांना आण्विक हल्ल्यांबद्दल काहीही बोलण्यास किंवा लिहिण्यास बंदी घातली होती. तरीही ‘निहॉन हिदानक्मयो’ संस्थेने अण्वस्त्रांमुळे होणारे भयंकर नुकसान आणि मानवी दु:ख याबद्दल जगाला शिक्षित करण्यासाठी हिबाकुशाची पथके जगाच्या विविध भागात पाठवली आहेत. यापुढे जगात कुठेही हिबाकुशा निर्माण होणार नाहीत आणि जग ‘अण्वस्त्रमुक्त’ होऊ शकेल याची काळजी घेण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
हिरोशिमा, नागासाकीवर 80 वर्षांपूर्वी अणुहल्ला
6 ऑगस्ट 1945 रोजी रात्री 8:15 वाजता अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर अलोना गे विमानातून अणुबॉम्ब टाकला. 43 सेकंद हवेत राहिल्यानंतर त्याचा स्फोट झाला. यानंतर लगेचच आगीचा मोठा गोळा निर्माण होऊन आजूबाजूचे तापमान 3,000 ते 4,000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. याची झळ अवघ्या 10 सेकंदात संपूर्ण हिरोशिमाला बसली. स्फोटानंतर काही मिनिटांतच 70 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हिरोशिमावर पडलेल्या बॉम्बचे नाव ‘लिटल बॉय’ होते. या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी अमेरिकेने नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला. या बॉम्बला ‘पॅट मॅन’ असे नाव देण्यात आले. 4,500 किलो वजनाचा ‘पॅट मॅन’ 6.5 किलो प्लुटोनियमने भरलेला होता. नागासाकी येथे रात्री 11.02 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अण्वस्त्र हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करल्यानंतर दुसरे महायुद्ध संपले होते.