‘नो यूपीआय’चा फटका बेळगावमध्येही
गुगल पे, फोन पे स्वीकारण्यास नकार
बेळगाव : बेंगळूर येथे काही व्यापाऱ्यांना यूपीआयद्वारे व्यवहार केल्याबद्दल जीएसटी विभागाकडून नोटिसा पाठविण्यात येत आहेत, असे वृत्त समाज माध्यमावरून प्रसिद्ध होताच याचे पडसाद बेळगावमध्येही पहायला मिळत आहेत. बेळगावमधील बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी गुगल पे, फोन पे व इतर यूपीआय पेमेंट घेणे बंद केले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने सरकारने याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ग्राहकवर्गातून केली जात आहे.
सध्या सर्वत्र डिजिटल पेमेंट केले जात आहे. अगदी पानपट्टीपासून ते मॉलपर्यंत सर्वच ठिकाणी यूपीआय पेमेंट स्वीकारले जात आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत खिशातून रक्कम घेऊन फिरणे कमी झाले. परंतु आठ-दहा दिवसांपूर्वी कर्नाटकातील कमर्शियल टॅक्स विभागाने यूपीआय पेमेंटची माहिती घेऊन 14 हजार व्यापाऱ्यांना जीएसटीची नोटीस पाठविली आहे. कर न भरता बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यूपीआय पेमेंटमुळे जीएसटीची नोटीस येत असल्याचा समज करून बेंगळूरमधील अनेक लहान विक्रेत्यांनीही यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद केले आहे, असे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी दुकानाबाहेर ‘नो यूपीआय ओनली कॅश’ असे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. याचा परिणाम बेळगावमध्येही दिसून येत आहे. शहापूरमध्ये एका व्यापाऱ्याने यूपीआय पेमेंट स्वीकारण्यास नकार दिल्याने एक लहान दुकानदार व त्यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. असेच प्रकार शहराच्या इतर भागातही सुरू आहेत. काहीजणांनी क्यूआर कोड काढून टाकले आहेत. असे झाल्यास नागरिकांची मोठी पंचाईत होणार असल्याने याबाबत जीएसटी अथवा सरकारच्या अर्थ विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.